दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा

शहरात दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये गुरुवारी (दि. 4) दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड श्रीमद् गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या समारोपप्रसंगी दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. पहाटे 5.30 वाजता अभिषेक, तसेच संध्याकाळी 6.15 वाजता पार पडलेला दत्त जन्मोत्सव सोहळा, महाआरती आणि महाप्रसाद याचा भाविकांनी लाभ घेतला. दत्तजन्मोत्सावानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
नाशिक शहरातील सिडको, देवळाली कॅम्प, जुने नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर आणि गोदाघाटातील सर्व दत्त मंदिरांमध्येही दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यथासांग पूजा, लघुरुद्राभिषेक, अभिषेक करण्यात आला. पारायण, कीर्तन, पालखी यामध्ये भाविकांनी सहभाग घेतला होता. ठिकठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
भाविकांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी विविध मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वतंत्र रांगा, प्रसाद विभाग, सुरक्षा, स्वच्छता आणि मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. चौकाचौकांत लावलेल्या सजावटी, रोषणाई आणि दत्त जयंतीच्या शुभेच्छा देणार्‍या फलकांमुळे संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण पसरले होते.
दत्त जन्मोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी गेल्या काही दिवसांपासून केलेली तयारी आणि उत्साह यामुळे यंदाचा उत्सव अधिक भक्तिभावपूर्ण आणि भव्यतेने पार पडला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *