गंगापूर व दारणा धरणातून विसर्ग वाढणार
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नाशिक : प्रतिनिधी
शहर आणि जिल्हयात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गंगापूर व दारणा धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. गंगापूर धरण व त्याच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणातील जलसाठा वाढला असून, आज बुधवार (दि. २० ऑगस्ट) सकाळी ८ वाजता गंगापूर धरणातून ५०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता हा विसर्ग १,५०० क्यूसेस करण्यात येईल. धरणातील पाण्याच्या आवकानुसार हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
नदीकाठच्या गावांना आवाहन
दरम्यान, विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना तसेच नदीपात्रात कोणतीही वसाहत, आठवडे बाजार किंवा शेतीसंबंधित कामे न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः आज बुधवारचा आठवडे बाजार नदीपात्रामध्ये किंवा पात्रालगत भरण्यात येऊ नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.