नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळेे धरणातून गुरुवारी (दि. 3) विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारी गंगापूर धरणातून 1,584 क्यूसेकने विसर्ग वाढविण्यात आला. एकूण 3,716 क्यूसेकने विसर्ग वाढला आहे. विसर्ग वाढल्याने गोदाकाठावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, जूनमध्ये नियोजित वेळी मॉन्सून दाखल झाला असून, त्यानंतर जिल्ह्यात पावसाने जोरदार बरसात केली. त्यामुळे जिल्ह्यातील धरण समूहात सध्या 53 टक्के पाणीसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणात 60.91 टक्के साठा आहे. भोजापूर धरण 100 टक्के भरले आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ व इगतपुरी तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नेंद झाली आहे.
दहा तालुके टँकरमुक्त
जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधारेमुळे टँँकरच्या संख्येत घट होऊन अवघे 19 टँकर जिल्ह्यात सुरू आहेत. जिल्ह्यातील दहा तालुके टँंकरमुक्त झाले आहेत. सध्या बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर व येवला या तालुक्यांत टॅँकर सुरू आहेत. पाच तालुक्यांतील 87 गावांतील 41,870 लोकसंख्येसाठी 19 टँंकरच्या माध्यमातून 42 टँकरफेर्या सुरू आहेत.
शहरात 3 मिलिमीटर पाऊस
शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. गुरुवारी (दि. 3) दुपारी शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसाची 3 मिलिमीटर नोंद झाली. पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
विविध धरणांतून विसर्ग
दारणा 2,690
गंगापूर 3,716
नांदूरमध्यमेश्वर 12,620
पालखेड 1,500
भोजापूर 70