भात उत्पादक शेतकरी हवालदिल; पावसामुळे रोगट वातावरण
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वत्र भात पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी अवकाळी पावसाने बळीराजाची केलेली धावपळ व पेरणीपूर्व मशागतीला आलेला अडथळा, पेरणीनंतर झालेले नुकसान, आवणीला झालेला विलंब यांसह विविध संकटांना तोंड देत भात उत्पादक शेतकरी यंदा जेरीस आला आहे. मशागतीचा आणि मजुरीचा खर्च तीन ते चार पटीने वाढला आहे. संततधार पावसाने रोगट हवामान निर्माण झाले आहे. भात पिकाला वेगवेगळ्या कीड आजारांनी ग्रासले आहे.
तालुक्यातील भात हे प्रमुख आणि एकमेव पीक आहे. यंदा 15 हजार 993 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. ही एकूण लागवडीच्या 92 टक्के आहे. तेच पीक आता हातातून जाणार असेल, तर वर्षभर खाणार काय? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. तालुक्यात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. खडी बरड जमिनीवर पावसाच्या पाण्यावर खरिपात जमेल तसे भाताचे पीक घेत आहे. त्यासाठी लागणारा भांडवली खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. बियाणे, पेरणी मशागत, आवणी, रासायनिक खते यासाठी झालेला खर्च प्रचंड आहे.
उधार उसनवार करून कशीबशी तोंडमिळवणी करत भात उत्पादक शेतकरी उसंत टाकत असतानाच रोगराईच्या अस्मानी संकटाने तोंडचे पाणी पळाले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शासनाच्या लाभाच्या योजना केवळ कागदावरच राहिलेल्या दिसतात.शासनाचा कृषी विभाग त्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यात अयशस्वी ठरला आहे. अगदी पीएम किसानचे 2000 रुपयेदेखील अनेक लाभार्थ्यांना मिळत नाहीत. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर प्रशासकीय राजवट असल्याने सर्वसामान्य शेतकरी दुर्लक्षित झाला आहे.
एकरी खर्चात दुप्पट वाढ
यंदा लागवडीचा खर्च वाढलेला आहे. इंधनाचे वाढते दर, बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती व माणशी मजुरीत झालेली वाढ. यामुळे लागवड खर्च मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे. एकरभर क्षेत्रासाठी दहा हजार रुपयांच्या जागेवर वीस हजार रुपये आवणीचा खर्च आला आहे. तालुक्यात काही ठिकाणी निंदणीची कामे आटोपली आहेत, तर काही भागांत अद्याप सुरू झालेली नाही. तशात रोगराईचे संकट आले आहे.