भाजपसह शिंदेसेनेसमोर बंडखोरांचे आव्हान



नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उबाठा गट, मनसे, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, आप व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यासोबतच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली आहे. दरम्यान, शनिवारी (दि.3) माघारीनंतर अपक्षांना विविध चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात अपक्षांना नारळ, शिट्टी, रिक्षा, कपबशी या चिन्हांना पसंती मिळाल्याचे दिसले.
महापालिका निवडणूक अर्ज माघारीनंतर शनिवारी (दि. 3) निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. निवडणूक लढविताना अपक्ष उमेदवारांना आपल्या मनाप्रमाणे निवडणूक चिन्ह मिळावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय, तसेच राज्यस्तरीय पक्षांकरिता, तसेच इतर राज्यातील पक्षांकरिता राखीव असलेले चिन्ह वगळता 200 वेगवेगळी चिन्हे नमूद करण्यात आली होती. पंचवटी विभागातील सर्वच प्रभागांत अनेक अपक्ष उमेदवारांनी एअरकंडिशन, ऑटोरिक्षा, नारळ, कपाट, शिट्टी, पुस्तक आणि कपबशी या चिन्हांना समान मागणी केली होती. त्यात त्यांना त्यांच्या पसंती क्रमांकानुसार व इतर उमेदवारांनी चिन्ह मागणी केली नसेल त्या गटानुसार चिन्ह वाटप करण्यात आले. कोणाला फुटबॉल, द्राक्ष, संगणक, गॅस सिलिंडर, तर कोणाला फळा, बस व रोडरोलर, इंजेक्शन चिन्ह मिळाले. बंडखोरी झाल्याने भाजप, शिंदेसेनेची चांगलीच डोकेदुखी झाली आहे. निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसण्याची भीती असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. पंचवटी व सिडकोमधील बंडखोरीची चर्चा अधिक होते आहे.
Distribution of symbols to independents; Coconut, whistle, rickshaw preferred