तंत्रज्ञानाच्या युगात समाधानाचा सणवाराचा मंत्र लोकांच्या मनावर अजून टिकून आहे. ज्याप्रमाणे रोजचा
सूर्योदय हा नवीन वाटत किंवा नवा उत्साह देणारा वाटत असतो. सूर्य हा कालचक्राचा निदर्शक मानला जातो; परंतु त्याच्या अस्तित्वाशिवाय संपूर्ण सृष्टी निरर्थक ठरू शकते. अगदी त्याचप्रमाणे भारतीय समाजव्यवस्थेसाठी सण-उत्सव हे रोजच्या सूर्योदयाप्रमाणे उत्साह देणारे असतात. सगळ्या सणांत दीपोत्सव म्हणजेच दीपावलीच्या पर्वात देशभरातल्या विविध परंपरांतसुद्धा दीपोत्सवाचा हा उत्साह दिसतो. सूर्य जसा सृष्टीला प्रकाशमान करतो त्याप्रमाणे हा दीपोत्सवही भारतीय समाजव्यवस्थेला प्रकाशमान करत आला आहे. नरक चतुर्दशीचा दिवस अनेक वर्षांच्या परंपरेत पहाटेचे सूर्योदयापूर्वीचे अभ्यंगस्नान आणि त्यानिमित्ताने प्राचीन काळी केला गेलेला नरकासुराचा वध म्हणजेच समाजव्यवस्थेसाठी किंवा सृष्टीच्या संरक्षणासाठी सत्प्रवृत्तींची जोपासना करण्याचा संदेश देऊन जातो. पुराणकथांमधून भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्याने बंदी करून ठेवलेल्या स्त्रियांची सुटका श्रीकृष्णाने केली. एकूणच त्यावेळच्या समाजाला त्राहीमाम करून सोडणार्या असुरी वृत्तींचा नाश करण्याचा संकल्प हे या दिवसाचे महत्त्व ठरते. विशेष म्हणजे, आजच्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी थेट यमाच्या नावाने तर्पण करण्याचा प्रघात सांगितला गेला आहे. याचा अर्थ ज्याची मनुष्याला भीती वाटते त्या यमाविषयी तितकीच आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विचार अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आगळावेगळा ठरतो. एकीकडे असुरी वृत्तींचा नाश करण्याविषयीचे स्मरण म्हणून हा दिवस लक्षात ठेवता येतो. दुसरीकडे, स्वतःच्या मनालादेखील सद्विचारांचे अभ्यंगस्नान घालून संकल्पपूर्वक अधिकाधिक उत्तम आयुष्य जगण्याचा आत्मविश्वासही प्राप्त करता येतो. केवळ एक सण-उत्सव म्हणून नरक चतुर्दशीचे सोपस्कार जरी पार पाडले जात असले, तरी त्या सोपस्कारांमध्ये दडलेले विचार आणि संस्कार संस्कृतीला आणि समाजव्यवस्थेला सशक्त करणारे ठरतात. यातली व्यापकता लक्षात घेतली तर व्यक्ती आणि समाजालासुद्धा मिळालेले आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगण्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो.
अंधार आणि आधार
या दीपोत्सवात घराघरांसमोर पणत्या लावल्या जातात. आकाशकंदील तेवत असतात. या सर्वांमधून आपापल्या घराचे मांगल्य अनुभवण्याची आणि त्यातले समाधान प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते. जर घरासमोरचा दिवा हा मांगल्याचे आवाहन करीत असेल तर देशभर तेवणार्या या कोट्यवधी पणत्या किंवा आकाशकंदील हे संपूर्ण विश्वाच्या मांगल्याचे अधिष्ठान ठरते. म्हणून भारतीय संस्कृतीने विश्वसंस्कृतीचा किंवा वसुधैव कुटुंबकम्चा विचार मांडून संपूर्ण मानवसृष्टीला आनंदाचे वरदान प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला. ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या पसायदानामध्ये ’विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो’ असे आवर्जून म्हटले आहे. ज्या सूर्यामुळे सृष्टीचे संचालन होते त्याचा प्रकाश हा जीवन जगण्याची ऊर्मी ठरतो. त्याचप्रमाणे हा विश्वधर्म टिकवून ठेवायचा असेल तर सूर्याप्रमाणेच या दीपोत्सवासारख्या मंगलपर्वाची आवश्यकता आपोआप सिद्ध होते. अनेक वेळेला आजच्या भौतिक जगात विज्ञानाचे महत्त्व सांगितले जाते; परंतु विज्ञानाचासुद्धा मानवी सुखासाठी किंवा समाधानासाठीच आटापिटा सुरू असतो. मनुष्याच्या बुद्धीवरच साकार होणार्या या विज्ञानाला सगळ्याच प्रकारच्या मर्यादा पडतात.म्हणूनच विज्ञानाबरोबरच आध्यात्मिक सुखाची एक सर्वश्रेष्ठ पातळी शाश्वत आनंद देणारी ठरते. त्या अध्यात्माची कास सोडून मनुष्य किंवा सृष्टीजीवनही आनंदी राहू शकणार नाही याबद्दल भारतीय संस्कृतीने सिद्धांत मांडले आणि निष्कर्षही काढले. म्हणूनच आजच्या अगदी अति आधुनिक युगातही भारतीय समाजव्यवस्थेने अध्यात्माची ही आत्मज्योत दीपोत्सवाच्या निमित्ताने तेवत ठेवलेली आहे. ज्ञानेश्वर माउलींनी अधिक स्पष्टपणाने त्याची जाणीव करून दिली. भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीत ते म्हणतात…
सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा जाणीव दे प्रकाशाची,
तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी..!
प्रकाशाची जाणीव प्राप्त व्हावी, या प्रकाशाला असलेले सूर्याचे अधिष्ठान लक्षात घेतले जावे आणि त्यातून प्राप्त होणारे हे आत्मज्ञान दिवाळीसारखाच आनंद देणारा ठरते. कोणताही प्रकाश हा केवळ अंधार नाहीसा करतो असे नाही, तर काहीतरी नवीन घडवता येऊ शकते. अशा नव्या संकल्पांचा तो आधारही ठरत असतो. अंधार नाहीसा झाल्याच्या आनंदापेक्षाही नवीन काहीतरी गवसल्याचे समाधान अधिक महत्त्वाचे ठरते.
प्रगल्भ समाजजीवनासाठी
संपूर्ण जीवसृष्टीत समाजजीवन हे जर परिपक्व आणि प्रगल्भ ठेवायचे असेल तर त्याचे सृष्टीबरोबरचे नाते अधिक बलिष्ठ असले पाहिजे. शरद ऋतूमध्ये येणारी ही दिवाळी एकूणच हवामानात सकारात्मक बदल घडवते; परंतु या काळातले हवामान मनुष्यप्रकृतीलाही पोषक राहिले पाहिजे. म्हणजेच शरीर आणि मनाची काळजी घेऊन या काळात कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्याचे मार्गदर्शन सणांच्या निमित्ताने होते. मग शरीराच्या त्वचेचा कोरडेपणा जाईल, स्निग्धता कायम राहील याकरिता उटणं लावण्यापासून ते तेलाने मालिश करण्यापर्यंतच्या गोष्टी यानिमित्ताने घडवून आणल्या गेल्या. भारतीय आयुर्वेदात तर उत्तम आरोग्यासाठी रोज औषधी तेलाचे अभ्यंग म्हणजे मालिश सांगितले गेले आहे; परंतु मनुष्याकडे एवढा वेळ नसतो. त्याचे स्वाभाविकपणे दुर्लक्ष होते. किंबहुना त्याचा आळस आणि हलगर्जीपणा लक्षात घेऊनच सणवाराच्या निमित्ताने अभ्यंगाचे महत्त्व बिंबवले गेले.
पौष्टिक आहारापासून ते मनाच्या प्रसन्नतेपर्यंतची काळजी या दीपोत्सवाच्या निमित्ताने घेतलेली पाहायला मिळते. सृष्टीकडे पाहण्याची एक विलक्षण दृष्टी हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य ठरते. यासाठीच दीपोत्सवासारख्या सवार्ंत मोठ्या सणामध्ये दडलेला हा व्यापक अर्थ समजून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. आपल्याला हवे असलेले समाधान हे आपल्याच शरीर मनाच्या प्रसन्नतेतून प्राप्त करता येते. ते बाहेरच्या भौतिक जगात शोधूनही मिळणार नाही. याची पूर्ण जाणीव संस्कृतीने ठेवली म्हणूनच आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात समाधानाचा सणवाराचा मंत्र लोकांच्या मनावर टिकून आहे.