लासलगाव : प्रतिनिधी
टाकळी(विंचूर)येथील डॉक्टरला विंचूर एमआयडीसी परिसरात दोन मोटारसायकल स्वारांनी पिस्तूलचा धाक दाखवून डॉक्टरला त्यांच्या अल्टो गाडीत बसवून येवला परिसरात नेले व डॉक्टरच्या एटीएममधून सुमारे दोन लाख २० हजार रुपयांची रक्कम काढली.त्यानंतर डॉक्टरचे हातपाय बांधून त्यांना अंदरसूलच्या पुढे झुडूपामध्ये फेकून दिल्याची घटना घडली.या प्रकरणी
लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार टाकळी विंचूर येथील डॉ.विनोद चंद्रभान ढोबळे हे नांदूरमध्यमेश्वर येथे व्यवसाय करतात.शुक्रवारी रात्री विंचूर एमआयडीसी येथे डॉक्टरांची बैठक होती त्यासाठी ते येत असताना मोटारसायकलवरील दोघांनी त्यांच्या मारुती अल्टो (एमएच १५ एफटी ३७६२) गाडीला अडवत दरवाजा उघडून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला.त्यानंतर त्यांनी गाडीत बसून या डॉक्टरांना विंचूर व तेथून पुढे येवला येथे नेले.त्यांच्या खिशातील रोख रक्कम ५ हजार रुपये काढून घेत खिशातील चार एटीएम कार्ड ताब्यात घेतले व त्यांचे पासवर्डसुद्धा पिस्तुलाचा धाक दाखवत विचारले. वेगवेगळ्या एटीएममधून चोरट्यांनी रक्कम काढली.हे दोघे चोरटे एक शाहरुख व दुसरा गणेश नावाने एकमेकांशी बोलत होते.
याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्ग खाली लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस करीत आहेत.