नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त
पळाशी : वार्ताहर
अॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या पिंपरखेड (ता. नांदगाव) येथील बोगस डॉक्टरवर तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी कारवाई करत नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यास अटक केली असून, त्याच्याकडील उपलब्ध औषधसाठा जप्त केला.
सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे कुठलीही वैद्यकीय परवानगी व शिक्षण नसताना अभिजित जगदीश मुखर्जी या बोगस डॉक्टरने ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. रुग्णाच्या जीवाशी खेळत उपचार केले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित मुखर्जी अॅलोपॅथिक औषधांद्वारे रुग्णांवर उपचार करीत असल्याची तक्रार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगताप यांच्याकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून डॉ. जगताप यांनी आरोग्य विस्तार अधिकारी अमोल कठाळे व डॉ. दत्तात्रय मोरे यांच्यासह मुखर्जी याच्या पिंपरखेड येथील दवाखान्यावर छापा टाकत कारवाई केली. या झडतीदरम्यान मुखर्जी याच्या दवाखान्यात अॅलोपॅथिक औषधे, शेड्युल एन वन अंतर्गत येणारी औषधे, बी.पी., मशीन, स्टेथोस्कोप, सलाइन स्टँड, डॉक्टर बॅग यांसह उपचार साहित्य आढळले. हा संपूर्ण साठा जप्त केला. संशयिताने यावेळी बीईएमएस, सीएमएस आणि ईडीपी, डीएनवायएस इलेक्ट्रोपॅथी अशा गैर अॅलोपॅथिक पदव्या सादर केल्या. याप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमांंतर्गत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सुनील बढे तपास करीत आहेत.