आस्वाद

डोनाल्ड ट्रम्प-शी जिनपिंग भेट

सहकार्याच्या पडद्यामागे महासत्तांचा संघर्ष!

– समाधान कदम

जागतिक राजकारणात महासत्तांमधील संघर्षाचे स्वरूप काळानुसार बदलत गेले आहे. विसाव्या शतकात अण्वस्त्रे, लष्करी सामर्थ्य आणि वैचारिक संघर्ष हे जागतिक सत्तास्पर्धेचे प्रमुख आधार होते. मात्र, एकविसाव्या शतकात या संघर्षाने तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून नवे स्वरूप धारण केले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढता संघर्ष याचे ठळक उदाहरण आहे.

अलीकडेच अमेरिकेतील आघाडीची कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर चिप उत्पादक कंपनी नेविडाचे तत्कालीन प्रमुख जेन्सेन हुआंग यांच्याशी संबंधित कथित हनी ट्रॅप आणि चिनी गुप्तचर यंत्रणांशी संबंध असल्याच्या संशयाने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा निर्माण केली. अलिस हुआंग नावाच्या चिनी व्यावसायिक महिलेचे चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा संशय अमेरिकेतील काही यंत्रणांनी व्यक्त केला. या प्रकरणात जेन्सेन हुआंग यांच्याशी तिचे वैयक्तिक संबंध असल्याचेही समोर आले. मात्र तिच्यावरील हेरगिरीचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. या घटनेमुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि राष्ट्रीय सुरक्षेचा परस्परसंबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
एनव्हिडियाही केवळ संगणकाच्या चिप्स तयार करणारी कंपनी नाही, तर आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तिच्या प्रगत चिप्सचा वापर एआय मॉडेल्स, सुपरकॉम्प्युटिंग, डेटा सेंटर्स आणि लष्करी संशोधनामध्ये केला जातो. त्यामुळे एनव्हिडियाच्या तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळविणे म्हणजे भविष्यातील आर्थिक आणि सामरिक सामर्थ्यावर प्रभाव निर्माण करण्यासारखे आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील तंत्रज्ञान स्पर्धेचे गांभीर्य लक्षात येते.
कृत्रिम बुद्धिमत्ता :
नव्या महासत्ता स्पर्धेचे रणांगण
आज कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ वैज्ञानिक संशोधनाची बाब राहिलेली नाही. अर्थव्यवस्था, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि गुप्तचर यंत्रणा अशा विविध क्षेत्रांमध्ये एआयचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांसाठी एआय क्षेत्रातील नेतृत्व मिळविणे, हा राष्ट्रीय सामर्थ्याचा प्रश्न अंतिम बनला आहे.
अमेरिकेकडे एनव्हिडिया, गुगल आणि जशिपअख यांसारख्या तंत्रज्ञान संस्थांचे सामर्थ्य आहे. दुसरीकडे, चीन डिप स्पिकसारख्या एआय प्रणाली विकसित करण्याबरोबरच
स्वतःचे सेमीकंडक्टर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अमेरिकेने चीनला अत्याधुनिक चिप्स आणि तंत्रज्ञान मिळण्यावर निर्यात निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या मते, या तंत्रज्ञानाचा वापर चीनकडून लष्करी क्षमता आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी केला जाऊ शकतो. चीन मात्र या निर्बंधांना आपल्या तंत्रज्ञान विकासातील अडथळा मानतो. यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. भविष्यातील जागतिक महासत्ता तीच असेल का जिच्याकडे सर्वाधिक लष्करी सामर्थ्य असेल, की ती असेल जिच्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर नियंत्रण असेल. अमेरिका आणि चीन यांच्यातील या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 नोव्हेंबर 2026 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा दौरा केला. चीनमधील शेनझेन येथे ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. या भेटीने जागतिक राजकारणाचे लक्ष वेधून घेतले. व्यापार, तंत्रज्ञान, आर्थिक संबंध आणि जागतिक सुरक्षेच्या प्रश्नांवर दोन्ही देशांत चर्चा झाली. या दौर्‍यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतची त्रिपक्षीय बैठकही चर्चेचा महत्त्वाचा भाग ठरली. या भेटीकडे केवळ दोन राष्ट्रप्रमुखांच्या राजनैतिक संवादाच्या स्वरूपात पाहणे पुरेसे ठरणार नाही. कारण अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांचे महत्त्वाचे व्यापारी भागीदार असले तरी जागतिक नेतृत्वासाठी त्यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू आहे. अमेरिकेला विद्यमान जागतिक व्यवस्थेतील आपले नेतृत्व टिकवायचे आहे, तर चीनला जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेत अधिक प्रभावशाली स्थान प्राप्त करायचे आहे.
ट्रम्प यांचे व्यापारविषयक धोरण, आयात शुल्क आणि तंत्रज्ञान निर्यातीवरील निर्बंध हे अमेरिकेच्या चीनविषयक धोरणाचे महत्त्वाचे घटक आहेत. दुसरीकडे, चीन आपल्या आर्थिक आणि तांत्रिक सामर्थ्याच्या माध्यमातून अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या भेटीत सहकार्याची भाषा असली तरी दोन्ही देशांचे मूलभूत सामरिक हितसंबंध वेगवेगळे आहेत.
जागतिक राजकारणातील बहुध्रुवीयतेचे आव्हान
शीतयुद्धाच्या काळात जग अमेरिका आणि सोव्हिएत संघ अशा दोन गटांमध्ये विभागले गेले होते. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर अमेरिकेचे जागतिक वर्चस्व वाढले. मात्र, चीनचा आर्थिक उदय, रशियाची सामरिक भूमिका, भारताचे वाढते महत्त्व आणि ब्रिक्ससारख्या संघटनांचा विस्तार यामुळे जागतिक सत्तासंतुलनात बदल होत आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या वास्तववादी सिद्धांतानुसार प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण आणि सामर्थ्यवृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील असते. अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा या सिद्धांताच्या आधारे समजून घेता येते. दोन्ही देश सहकार्य करतात; परंतु आपल्या सामरिक हितसंबंधांशी तडजोड करण्यास तयार नसतात. त्यामुळे जागतिक राजकारणात सहकार्य आणि संघर्ष या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू असल्याचे दिसते. अमेरिका-चीन संबंधांमधील बदलांचा भारतावरही महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. भारत हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा देश असून, त्याचे अमेरिका, जपान, रशिया आणि चीन या सर्वांशी वेगवेगळ्या स्वरूपाचे संबंध आहेत. अमेरिकेसोबत संरक्षण, तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रातील सहकार्य भारतासाठी महत्त्वाचे आहे. त्याचवेळी रशियासोबतचे पारंपरिक संरक्षण संबंध आणि चीनसोबतचे सीमावाद हे भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील महत्त्वाचे मुद्दे आहेत. या परिस्थितीत भारताने कोणत्याही एका महासत्तेच्या प्रभावाखाली न राहता धोरणात्मक स्वायत्तता कायम ठेवणे आवश्यक आहे. क्वाडमधील सहभाग, भारत-जपान सामरिक भागीदारी, स्वदेशी सेमीकंडक्टर उद्योगाचा विकास आणि एआय क्षेत्रातील संशोधन या माध्यमांतून भारत स्वतःचे स्थान अधिक मजबूत करू शकतो. अमेरिका आणि चीन यांच्यातील तंत्रज्ञान स्पर्धा भारतासाठी काही संधी निर्माण करू शकते. जागतिक कंपन्यांच्या उत्पादन आणि संशोधन गुंतवणुकीसाठी भारत पर्यायी केंद्र बनू शकतो. मात्र, यासाठी भारताला संशोधन, कौशल्यविकास, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वावलंबन वाढवावे लागेल. ट्रम्प-शी जिनपिंग भेट ही बदलत्या जागतिक सत्तासंतुलनाचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. या भेटीतून महासत्तांमधील सहकार्याची गरज अधोरेखित होत असली, तरी त्यामागील स्पर्धा संपलेली नाही. आजचे जागतिक राजकारण केवळ सीमा, लष्करी सामर्थ्य आणि व्यापारापुरते मर्यादित राहिलेले नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, सायबर सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा आणि माहितीवरील नियंत्रण ही नव्या सत्तासंघर्षाची प्रमुख क्षेत्रे बनली आहेत. महासत्तांमधील संघर्ष आता रणांगणावरच नव्हे, तर प्रयोगशाळा, तंत्रज्ञान कंपन्या, डेटा सेंटर आणि जागतिक बाजारपेठांमध्येही लढला जात आहे. त्यामुळे ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील भेट ही केवळ राजनैतिक घटना नसून भविष्यातील जागतिक व्यवस्थेच्या दिशेचा वेध घेणारी घटना म्हणून पाहणे आवश्यक आहे.

Donald Trump–Xi Jinping meeting

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

ऐका होऽऽ ऐका..

- वासवदत्ता अग्निहोत्री चित्रपटात, नाटकात, जुन्या कथांमधून आपण हे बर्‍याच वेळेस ऐकलेय. अधिकारीवर्ग, दवंडी पिटून…

5 minutes ago

दिव्या दिव्या दीपत्कार…

- सुजाता येवले पूर्वीच्या काळातले दिवे लागण्याच्या कातरवेळेला वातावरण आणि मन शुभ पवित्र, ऊर्जाभारित बनवणारे,…

9 minutes ago

वेदनेचा बाजार

- सीमाताई मराठे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.…

17 minutes ago

निती आयोगाचे सल्ले

- राजेश शिरभाते राज्यातील विविध प्रकल्पांसाठी व ते सुरळीत कार्यान्वित होण्यासाठीचे अनेक महत्त्वाचे सल्ले काल…

33 minutes ago

इगतपुरीत पंचवटी एक्स्प्रेसखाली येऊन मामा-भाचा गंभीर जखमी

भाच्याने गमावला पाय; मामाच्या हाताची बोटे तुटली इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी रेल्वेस्थानकावर पंचवटी एक्स्प्रेसमधून प्रवास…

1 hour ago

दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याचा राग

दगडाने ठेचून तरुणाचा खून नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दारू पिताना झालेल्या वादातून शिवीगाळ केल्याचा राग…

1 hour ago