राजकारणापेक्षा मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊ :खासदार अमोल कोल्हे
नाशिक :प्रतिनिधी
प्रत्येक गोष्टीवर सतत राजकारण करण्याऐवजी आपण सर्व जण मुलभूत प्रश्नाकडे लक्ष देऊयात ,महाराजांवरून सध्या सुरू असलेले राजकारण हे चुकीचे आहे.महापुरुषांचा राजकारणासाठी कोणीही वापर करून नये असे स्पष्ट मत खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी हाॅटेल टोरेटाॅल येथील आयोजित पत्रकार परिषदेत केले. शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या माहिती संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले.
सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरून सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना कोल्हे म्हणाले,महाराज सर्व पक्ष आणि नेत्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. प्रत्येकाच्याच मनात महाराजांप्रती आदर भाव आहे. त्यामुळे आपल्या राजाचा आपमान होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घ्यायला हवी.
विश्वास पाटील यांनी लेखन स्वरूपात छत्रपती संभाजी माहराजांचा इतिहास मांडला तर मी दृकश्राव्य माध्यमातून मांडत आहेत. असे कोल्हे म्हणाले. आपल्या राजाचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचला तर तो इतिहास टिकेल.. पर्यटक गड किल्ले पाह्यला येतील आणि त्यातून गड किल्ल्यांचे संवर्धन होईल असे ते म्हणाले.
महाराज हेच जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव जाणता राजा आहेत. त्यांच्याशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. महाराज हे कायमच श्रेष्ठ आहेत. शरद पवार यांना जाणता राजा संबोधले जाते. पण त्याचा अर्थ ती महाराजांची तुलना नसते तर पवार साहेबांना सध्याच्या राजकारणाची सर्व माहिती आहे म्हणून त्यांना जाणता राजा असे संबोधण्यात येते असे कोल्हे म्हणाले. आणि जर कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करत जाणता राजा म्हणत असेल तर शिवप्रेमी ही गोष्ट खपवून घेणार नाही. आणि शरद पवार यांनाही ते आवडणार नाही असे कोल्हे म्हणाले.