प्रत्येक क्षेत्रातील गोरगरीब जनतेवर अतोनात अन्याय व अत्याचार केला जात आहे. श्रीमंतांना कोणत्याच रांगेत थांबू न देता तत्काळ त्यांची कामे केली जात आहेत. शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांचे आई-वडील जर श्रीमंत असतील तर गोरगरीब विद्यार्थ्यांना डावलून श्रीमंत बापाच्या मुलांकडे ते शिक्षक जास्त व विशेष लक्ष देतात. त्यांच्याकडून रोजच्या रोज गृहपाठ लिहून घेतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना प्रत्येक विषयात तरबेज बनवतात.
मीसुद्धा पाहिले आहे की, आम्हा गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेत असताना कोणताच शिक्षक विशेष लक्ष देत नव्हता; परंतु ज्या मुलांचे अथवा मुलींचे आई-वडील नोकरदार आहेत, रोज शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत येतात आणि शिक्षकांना चहापान करतात, त्याच बापाच्या विद्यार्थ्यांकडे शाळेतील गुरुजी नीट लक्ष देतात. प्रश्न विचारायचे झाले तर श्रीमंत बापाच्या मुलांनाच विचारायचे आणि गृहपाठ त्यांच्याकडूनच लिहून घ्यायचा आणि गृहपाठ लिहून पूर्ण झाला तर श्रीमंत बापाच्या मुलाचाच तेवढा पाहायचा. गोरगरीब व ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील शेतात काबाडकष्ट करून आपली उपजीविका भागवतात त्या गोरगरीब बापाच्या मुलांकडे आजकालचे शिक्षक म्हणावे तेवढे लक्ष देत नाहीत. ज्या मुलाचे आई-वडील रोज शाळेत येऊन शिक्षकांना त्यांच्या कार्याची वाहवा करतात, शिक्षकांना मानपान देतात आणि त्यांना हॉटेलमध्ये नेऊन चहापान करतात. म्हणून आजकालचे शिक्षक अशा श्रीमंत बापाच्या मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना चांगला विद्यार्थी घडवतात.
खरेतर शिक्षकांना सर्वच विद्यार्थी समान असायला हवेत. प्रत्येक विद्यार्थी घडावा, प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करावे आणि आई-वडिलांच्या कष्टांचे काहीतरी चीज करावे आणि स्वतःचे भवितव्य उज्ज्वल करावे म्हणून प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे तेवढेच लक्ष द्यायला हवे. शिक्षकांनी केवळ ठराविक विद्यार्थ्यांकडेच लक्ष दिले तर आपण जाणीवपूर्वक गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहात म्हणून समजा. सरकारी दवाखान्यात अथवा खाजगी दवाखान्यात जो रुग्ण अधिक पैसेवाला आहे, त्याचे राजकीय लोकांसोबत चांगले संबंध आहेत अशा श्रीमंत रुग्णाला रांगेत न थांबता डायरेक्ट ओपीडीमध्ये घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले जातात; परंतु गोरगरीब जनता एका रांगेत खूप वेळ ताटकळत उभी टाकलेली असते. त्यांना रांग लावून त्यांचा क्रमागत नंबर आल्यासच मधे बोलावले जाते. जास्त गंभीर असलेले रुग्ण रांगेतच आपला जीव सोडून देतात.
आजकाल सरकारी दवाखान्यात मी पाहिले आहे की, जो पेशंट राजकीय लोकांच्या संबंधातील आहे, ज्यांच्याकडे भरपूर पैसा व संपत्ती आहे, ज्यांचे डॉक्टरांशी चांगले बोलणे आहे, अशा लोकांनाच सरकारी दवाखान्यात तत्काळ इलाज केला जातो. मोठ्या घरातील रुग्णाला रांगेत न थांबता डायरेक्ट मध्ये बोलावून त्यांच्यावर इलाज सुरू केला जातो. इकडे गोरगरीब जनता मरणाच्या दारात उभी असते. तरीसुद्धा सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना त्यांची जराही कीव येत नाही. एवढा गोरगरिबांवर अन्याय, अत्याचार करणे ही खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे.
चांगल्या महाविद्यालयाला अॅॅडमिशन घेण्यासाठी सगळेच विद्यार्थी आतुर असतात; परंतु जे विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना डावलून जे विद्यार्थी श्रीमंत घरातील व राजकीय लोकांच्या संबंधातील आहेत, अशा लोकांनाच मोफत अॅॅडमिशन मिळत आहे. गोरगरीब मुलांकडून भरमसाट शुल्क घेतले जाते आणि तेव्हा त्यांना कुठे अॅॅडमिशन मिळते. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जा तिथे गोरगरीब जनतेवर अन्याय होतोच.
शासकीय कामानिमित्त आपण तहसील कचेरीत किंवा नगरपालिकेमध्ये गेलो तर गोरगरीब जनतेकडे कोणीच लक्ष देत नाही. गोरगरीब जनतेला पैसे देऊन काम करून घ्यावे लागते. श्रीमंत लोकांना बारीला न थांबता डायरेक्ट आल्याबरोबर त्यांचे मोफत काम करून त्यांना बाहेर काढून दिले जाते. गोरगरीब जनता मात्र आपले काम बुडवून तहसीलच्या व नगरपालिकेच्या कामाला रोज खेट्या मारत असतात. बँकेत पीकविमा भरताना किंवा पैशाचा व्यवहार करताना जी माणसे पैशाने मोठी आहेत, ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे, अशा लोकांना बँक कर्मचारी तत्काळ पैसे देऊन मोकळे करतात. त्यांना बँकेचा व्यवहार करताना रांगेत उभा टाकण्याची काहीच गरज पडत नाही.
गोरगरीब सामान्य जनता मात्र शेतातील काम बुडवून बँकेत आलेली असते. त्यांचा नंबर असतानादेखील त्यांच्याऐवजी एखाद्या मोठ्या गलेलठ्ठ पगार असणार्या माणसासोबत अगोदर पैशाचा व्यवहार केला जातो. गोरगरीब जनता मात्र दिवसभर उभी असते. एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने बरीच मान्यवर मंडळी आलेली असते व गोरगरीब जनता ही आलेली असते. त्या कार्यक्रमात गोरगरिबांना सत्कारासाठी कोणीच बोलावत नाही; परंतु जो व्यक्ती श्रीमंत आहे, राजकीय व्यक्तीच्या संपर्कातला आहे,
अशा लोकांचे नाव सत्काराला पुकारले जाते. पण गोरगरीब शेतकर्यांचे व कष्टकर्यांचे सत्कारासाठी नाव कोणीच घेत नाही, ही अतिशय खेदाची बाब म्हणावी लागेल. एवढा गोरगरिबांवर अन्याय बरा नाही. गैरव्यवहार करणार्या कर्मचार्यांना निलंबित केले पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. मग ते कोणत्याही क्षेत्रातील कर्मचारी असोत, प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे. गोरगरीब व सामान्यांवर अन्याय होता कामा नये. नाहीतर गोरगरीब जनता एकदा पेटून उठली व त्यांच्यातील भावना उफाळून आल्या तर संपूर्ण देशाला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील.
Don’t do injustice to the poor people!