पहचानता नही क्या, मै यहाँ का भाई हूँ!

कॅन्टीनची तोडफोड करणार्‍याला बेड्या

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
कोयत्याचा धाक दाखवून येथील नाशिकरोड रेल्वे स्थानकावर असलेल्या कॅन्टीनचालकाला दमबाजी करून हप्ता दिला नाही तर हात-पाय तोडून टाकेल, अशी धमकी देऊन कॅन्टीनची तोडफोड करणार्‍या संशयित आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी अजय मिलिंद जाधव (वय 22, रा. सामनगाव रोड, जयप्रकाशनगर) हे झारा कॅन्टीनवर काम करत असताना शाहरुख पटेल (रा. गुलाबवाडी) या युवकाने पाण्याची बाटली व वेफर्स घेतले. याबाबत पैसे मागितल्यावर आरोपीने म्हणाले, तू मुझे पहचानता नही क्या? मैं यहा का भाई हूँ और मुझे 500 रुपये हफ्ता देना पडेगा, नही तो मैं तेरे पैर तोड डालूंगा. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत पैसे न दिल्यामुळे कॅन्टीनची तोडफोड करत खंडणीची मागणी केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख अकबर पटेल (वय 29) असल्याचे निष्पन्न झाले. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने त्यास सुभाष रोडजवळील रेल्वे पार्किंग परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. ही कारवाई अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष उफाडे, पो.हवा. शैलेंद्र पाटील, राज बच्छाव, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक नवीनकुमार सिंह, आरक्षक मनीषकुमार, सागर वर्मा, के. के. यादव यांनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *