मुंबई प्रवासासाठी दुहेरी टोलचा भुर्दंड

नाशिक : प्रतिनिधी
भिवंडी बायपासचा खोळंबा टाळण्यासाठी राज्य शासनाने बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी असा समृद्धी महामार्ग कार्यान्वित करून नाशिककरांना जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली खरी. मात्र, नाशिककरांसाठी या महामार्गाचा लाभ सीमित राहिला आहे. नाशिक शहरातून समृद्धी महामार्गावर पोचण्यासाठी अद्याप सुस्थितीत आणि अधिकृत जोडरस्ता उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांना दोन टोलचा भुर्दंड सहन करावा
लागत आहे.
नाशिक शहर समृद्धी महामार्गाशी भरवीर मार्गातून जोडला जाणार होता. या मार्गासाठी भूमी अधिग्रहणही पूर्ण झाले असून, शेतकर्‍यांना भरपाई मिळालेली आहे. तथापि, या मार्गाचे प्रत्यक्ष बांधकाम अद्याप सुरू झाले नाही. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने या रस्त्यासाठी निविदा (टेंडर) प्रक्रिया सुरू केली होती, पण कोणत्या कारणास्तव ती प्रक्रिया रद्द करण्यात आली. याबाबत खुलासा होत
नाही.
प्रत्यक्षात हा मार्ग सिंगल टायर रोड (डांबरी रस्ता) आहे. तोे अरुंद असून, वाहनांच्या सुरक्षित व वेगवान प्रवासासाठी योग्य नाही. त्यामुळे वाहनधारकांना हा मार्ग टाळावा लागतो आणि पर्यायी मार्गाचा वापर करतानाच दुहेरी टोल भरावा
लागतो.

भरवीर मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम त्वरित सुरू करावे
समृद्धी महामार्गाने राज्यात प्रगतीच्या नव्या संधी उघडल्या असल्या, तरी नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहराला अद्याप त्याचा पूर्ण लाभ घेता आला नाही. सुस्थितीत आणि अधिकृत जोडरस्ता नसेल तर संपूर्ण समृद्धी मार्गदेखील नागरिकांसाठी अधुरी सोय ठरते. त्यामुळे प्रशासन आणि राज्य शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन भरवीर मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

निमा, आयमा करणार पाठपुरावा
या प्रश्नामुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फटका बसत आहे. निमा आणि आयमा या उद्योग संघटनांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. डबल टोल हटवणे किंवा लवकरात लवकर जोडरस्ता पूर्ण करणे, यासाठी न्हाईसह शासनस्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *