नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५’चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५’चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे तिन्ही स्पर्धक महाराष्ट्राचे

नाशिक : प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवार दि.१२ जानेवारी रोजी पार पडलेल्या ९ व्या राष्ट्रीय व १४ व्या राज्यस्तरीय ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२५’ स्पर्धेतील फूल मॅरेथॉनचे (४२.१९५ किमी) विजेतेपद मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेरा याने पटकावले. विशेष म्हणजे कार्तिकने २ तास २० मिनिटे या विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करून नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या अक्षय कुमारने २ तास २६ मिनिटे ०१ सेकंद या वेळेत स्पर्धा पूर्ण केली होती.

कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्‍याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. वेगवेगळ्या १४ गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत धावपटूंनी सहभाग नोंदविला. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनने स्पर्धेला सुरवात झाली. भारतीय हॉकी संघातील खेळाडू तथा रियो ऑलिम्पिकपटू रेणुका यादव, आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, ॲड. आर. के. बच्छाव, ॲड. संदीप गुळवे, शिवाजी गडाख, प्रवीण जाधव, शालनताई सोनवणे, शोभाताई बोरस्ते, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, प्रा. सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरवात करण्यात आली.
फूल मॅरेथॉनमध्ये धावताना डॉ. कार्तिकने २ तास २० मिनिटे अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख ५१ हजार रूपयांचे पारितोषिक पटकावले. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सिकंदर चिंधू तडाखे या धावपटूने २ तास २० मिनिटे २ सेकंद अशी वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकाचे एक लाखाचे तर महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील विक्रम भरतसिंह बंगरिया या धावपटूने २ तास २० मिनिटे १२ सेकंद अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांकाचे ७५ हजारांचे पारितोषिक पटकावले.

 

स्पर्धेसाठी देशभरातून उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटू असे एकूण साडेतीन हजारापेक्षाही जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे फूल मॅरेथॉनमधील पहिले तिन्ही धावपटू हे महाराष्ट्रातील आहेत. तसेच, नाशिकच्या सिकंदर तडाखे याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दुसरा क्रमांक कायम ठेवत मागील वर्षीपेक्षा यंदा सहा मिनिटे २१ सेकंद आधी स्पर्धा पूर्ण करून स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *