महावितरणच्या कारभारामुळे वीजपुरवठा खंडित
इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी शहराला मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नगर परिषदेने कोट्यवधी रुपये खर्चून भावली धरणातून शहरापर्यंत पाइपलाइन योजना केली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात भावली धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे भावली परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नगर परिषद व तळेगाव येथील जीवन प्राधिकरण तलावाचे पाणी शहराला कमी पडत असल्याने चार वर्षांपूर्वी भावली धरणातून ही योजना सुरू केली आहे. एप्रिलमध्ये नगर परिषद व तळेगाव येथील तलावातील पाणी आटल्याने आता केवळ भावली धरणातील पाण्याच्या भरवशावर इगतपुरीतील नागरिकांची भिस्त आहे. शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने शासनाच्या 38 कोटी निधीअंतर्गत नळपाणी योजनेचे काम केले आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात भावली धरण परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीउपसा करता येत नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत.