दुबई वॉर्डाला समस्यांचा विळखा!

लक्ष्यवेध : प्रभाग-14

पाणीप्रश्न कायम, पक्षांतरामुळे समीकरणे बदलली

नाशिक शहरातील दुबई वॉर्ड म्हणून प्रभाग क्रमांक 14 ओळखला जातो. वॉर्ड भलेही दुबई असला, तरी या प्रभागात अनेक प्रकारच्या समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. त्यामुळे हे ग्रहण सोडविण्याची अपेक्षा प्रभागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्‍या शहरातील या प्रभागात आजही पाण्याची समस्या कायम आहे. ड्रेनेज लाइन आणि पाण्याची लाइन एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांना खराब पाणी प्यावे लागत आहे. वर्षानुवर्षे त्याच त्या समस्या कायम असल्याने या समस्या सुटणार तरी केव्हा, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे यंदा प्रभागाच्या विकासासाठी या भागातील नागरिक कुणाला पसंती देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुस्लिमबहुल मतदार असलेल्या जुन्या नाशिकमधील या प्रभागात सर्वाधिक मतदारसंख्या ही मुस्लिम समाजाची आणि त्याखालोखाल इतर समाजाची आहे. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन, तर एक अपक्ष असे चार नगरसेवक निवडून आले होते. परंतु आता भाजप वगळता सर्वच पक्षांचे दोन गट तयार झाल्याने राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या तीनही माजी नगरसेवकांनी सध्या पक्षांतर केले आहे. त्यामुळे बदललेल्या समीकरणामुळे आता निवडणुकीचे गणित आखावे लागणार आहे. पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुल्यबळ उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल. पूर्वी प्रभाग क्रमांक 14 हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. त्यात सर्वसाधारण गटातून सुफी जीन, ओबीसी महिला गटातून समीना मेमन, अनुसूचित जाती गटातून शोभा साबळे निवडून आले. तसेच अपक्ष मुशीर सय्यद यांनी सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बबलू पठाण यांच्यापेक्षा 411 मते जास्त घेऊन अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केला होता. मात्र, आता पक्ष दुभंगल्याने राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका समीना मेमन यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. माजी नगरेसविका शोभा साबळे यांचे पती तथा स्थायी समितीचे माजी सभापती संजय साबळे यांनी अलीकडेच रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला तुल्यबळ उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. मागच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून विजय झालेले सुफी जीन व अपक्ष मुशीर सय्यद हे यंदा समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी नगरसेवक बबलू पठाण यांच्या वहिनी तथा माजी नगरसेविका शबाना पठाण या सर्वसाधारण महिला गटातून, तर आसिफ मुलाणी यांची कन्या महिला ओबीसी गटातून, बब्बू शेख यांच्या पत्नी अनुसूचित जाती प्रवर्गातून इच्छुक आहेत. अल्फान हाश्मी हेदेखील इच्छुक आहेत. संजय खैरनार, रतन काळे, सुरेश दलोड हेदेखील राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. याच प्रभागातून गेल्यावेळी शोभा साबळे यांना लढत दिलेल्या गंगूबाई गुडेकर यादेखील इच्छुक आहेत. याशिवाय मयूरी गायकवाड, शबनम पिंजारी यादेखील इच्छुक आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेविका समीना मेमन उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सर्वसाधारण गटातून अपक्ष निवडून आलेले मुशीर सय्यद यांच्या जागेवर आता त्यांची कन्या अदिना सय्यद सर्वसाधारण महिला गटातून, तर मुशीर सय्यद हे सर्वसाधारण गटातून निवडणूक लढणार असल्याचे समजते. माजी महापौर विनायक पांडे यांच्या पत्नी अनिता पांडे या सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी करणार आहेत. हाजी मुजाहिद सर्वसाधारण गटातून इच्छुक आहेत. मनसेकडून रूपेश पहाडी, गोविंद बिरूटे, सागर बेदरकर इच्छुक आहेत. अक्रम बिलाल खतीब, कल्पना दोंदे गायकवाड, अंकुश राऊत, गुलाब सय्यद, फिरोज नवाब, हितेश कांबळे, सुनील कमोद, शिफा मेमन, जबीन पठाण, शकिला फारूखी हेदेखील इच्छुक आहेत.
माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह माजी नगरसेवक संपत जाधव, माधुरी जाधव, बबलू परदेशी, मनोज घोडके, जावेद शेख यांनी 13 व 14 यापैकी कोणत्याही एका प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. माजी नगरसेवक राजेंद्र बागूल व समीर शेटे हे प्रभाग 13 मधून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मुशीर सय्यद मागील वेळेस अपक्ष निवडून आले होते. सध्या ते कोणत्याच पक्षात नाहीत. या प्रभागात अल्पसंख्याक समाजाची मते निर्णायक ठरतात. प्रभागात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. गल्लीबोळात अ‍ॅम्बुलन्सदेखील जाऊ शकत नाही. कचर्‍याचा तसेच पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रभागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत भूमिगत केबल टाकण्याचे काम झाले नाही. जहाँगीर कब्रस्तान येथे विजेचे खांब बसविलेले नाहीत. रसूलबाग कब्रस्तानमध्ये विजेचे खांब बसविलेले नाहीत. नमाज हॉलचीही दुरुस्ती झालेली नाही.

विद्यमान नगरसेवक

मुशीर सय्यद,

शोभा साबळे,

सुफी जीन,

समीना मेमन,

प्रभाग 14 मध्ये करण्यात आलेली जनाजा रथाची सुविधा.

प्रभागात झालेली कामे

• बागवानपुरा रस्ता काँक्रीटीकरण.
• मनोहरनगर, संजीवनीनगर रस्ता
काँक्रीटीकरण.
• जनाजा रथ.
• नानावलीत पाण्याची टाकी.

प्रभागातील समस्या

• सारडा सर्कल, नॅशनल उर्दू शाळेसाठी पादचारी पूल नाही.
• अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त.
• प्रभागात रस्ते, पथदीपांची कामे अपूर्ण.
• अनेक ठिकाणी रस्त्यांवर कचराकुंड्या तयार झाल्याने आरोग्याच्या समस्या.
• अनियमित पाणीपुरवठा.
• प्रभागात घंटागाडी अनियमित.
• धोकादायक वाड्यांचा प्रश्न रेंगाळलेलाच.

सारडा सर्कलवरील वाहतूक कोंडी
सारडा सर्कलवर दररोज सायंकाळी आणि दुपारी होणारी वाहतूक कोंडी या भागातील मुख्य समस्या बनलेली आहे. या ठिकाणीच शाळा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. वाहनांच्या रांगा लागतात. त्यातून सर्वसामान्यांना मार्गक्रमण करणे अवघड होते.

2011 नुसार लोकसंख्या

• लोकसंख्या ः 51,618
• अनुसूचित जाती ः 7,104
• अनुसूचित जमाती ः 2,039

असे आहे आरक्षण

• अ- एससी • ब- ओबीसी महिला
• क- महिला (खुला) • ड- खुला

इच्छुक उमेदवार

मुशीर सय्यद, शोभा साबळे, सुफी जीन, समीना मेमन, माजी महापौर विनायक पांडे, माजी नगरसेवक संपत जाधव, माधुरी जाधव, बबलू परदेशी, मनोज घोडके, जावेद शेख, शबाना पठाण, अल्फान हाश्मी, संजय साबळे, हाजी मुजाहिद शेख, गंगूबाई गुडेकर ऊर्फ शिरीन मुल्तानी, हाजी बबलू पठाण, नाझिया अत्तार, अक्रम खतीब, साजिद मुलताणी, दिगंबर नाडे, रामसिंग बावरी, शबनम पिंजारी, संदीप डहाके, मोइन शेख, डॉ. धीरज शर्मा, बजाहत बेग, जुबेर हाश्मी, मयूरी गायकवाड, फिरोज मन्सुरी, अंकुश राऊत, बब्बू शेख, मोइन हनीफ, नंदू कहार, शबनम मन्सुरी, शरद काळे, ज्ञानेश्वर काळे, शशी हिरवे, कल्पना दोंदे-गायकवाड, ज्ञानेश्वर पवार.

ड्रेनेजची मुख्य समस्या
प्रभागात ड्रेनेजची मोठी व गंभीर समस्या आहे. पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन व ड्रेनेजलाइन एकाच ठिकाणी असल्यानेच पाण्याच्या पाइपमधून ड्रेनेजचे घाण पाणी कधीकधी थेट नळाद्वारे येते. यातून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मी या प्रभागात इच्छुक असून, प्रभागातील नागरिकांना समस्यांपासून कायमची सुटका होईल असे काम करायचे आहे. शिवाय वाहतूक ही मोठी समस्या होऊन बसली आहे. यावर माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्यावर मी काम करणार आणि यावर कायमचा तोडगा निघेल असेच काम करून दाखणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटल येथे सुसज्ज व्यवस्था निर्माण करण्याचा मानस आहे.
– ज्ञानेश्वर काळे,  अध्यक्ष, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग

उपेक्षित प्रभाग
अनेक नगरसेवक झालेे मात्र, संत कबीरनगर, महालक्ष्मी चाळ यांसंदर्भात विचार कुणीच केला नाही. क्लस्टर योजना राबविणे गरजेचे होते. मात्र, ती या भागातील नगरसेवक अथवा आमदारांनी राबवली नाही. अमरधामचे नूतनीकरण करणे गरजेेचे आहे. या भागाला नेहमी उपेक्षित ठेवले गेले. लाखो भाविक, भक्त या भागातूनच सिंहस्थ पर्वणीला जातात. मात्र, हा मुख्य चौक वाहतूक कोंडीत हरवून गेला आहे. द्वारका चौकातील पादचारी मार्ग काढून टाकण्याचे फक्त आश्वासन दिले गेले. मात्र, तो मार्ग अजूनही मोकळा केलेला नाही. तो तातडीने काढून टाकण्याची गरज आहे.
– रामसिंग बावरी, हिंदू एकता आंदोलन

प्रभागाचा परिसर

गंजमाळ, कोकणीपुरा, चौकमंडई, मुलतानपुरा, काझीपुरा, वझरेरोड, भोईवाडा, मातंगवाडा, नानावली, रेणुकानगर, नागसेनवाडी, फाळके रोड, गुरुद्वारा, सारडा सर्कल परिसर.

रखडलेली कामे

• रेणुकानगरमधील रस्ते.
• चौकमंडई, वाकडी बारव कारंजा सुशोभीकरण.
• बागवानपुरातील पाणीप्रश्न.
• सारडा सर्कल येथे पादचारी उड्डाणपूल.
• कचराकुंडीमुक्त प्रभाग.
• अद्ययावत गटारी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *