मुबलक साठा असूनही नागरिकांची पाण्यासाठी प्रतीक्षा; प्रशासनाचा कपातीचा निर्णय
सिन्नर : प्रतिनिधी
शहराला पाणीपुरवठा करणार्या कडवा धरणावरील पाणीपुरवठ्याच्या पंपिंग स्टेशनवर सातत्याने खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सिन्नर शहरात शनिवार(दि.14)पासून दिवसाआडऐवजी दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सिन्नर नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे. सध्या दिवसाआड पाऊण तास मिळणारे पाणी आता दोन दिवसांआड करण्यात आल्याने नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.
महिनाभरापासून कडवा धरण येथील योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरासाठी आवश्यक तेवढा पाणी उपसा होत नाही. पंपिंग स्टेशनला एक्स्प्रेस फीडरद्वारे वीजजोडणी असली तरी दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी, तीन ते चार तास उपसा पूर्णपणे ठप्प राहतो आणि दररोज सुमारे 25 ते 30 लाख लिटर पाण्याची तूट निर्माण होते. शहरात 18 हजारांहून अधिक नळजोडणीधारक असून, अनियमित पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही तूट भरून काढणे अशक्य झाल्याने प्रशासनाने पाणीपुरवठ्याची वारंवारता कमी करण्याचा निर्णय घेतला. धरणात पुरेसा साठा उपलब्ध असतानाही केवळ वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी शहरापर्यंत पोहोचत नाही. प्रत्यक्षात पाणी असूनही कपातीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने नियमित वीजपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कायमस्वरूपी तोडगा काढणार
योजनेला प्रारंभी साकूर फाटा येथील 33 केव्ही केंद्रातून वीजपुरवठा केला जात होता. नंतर दाब वाढवण्यासाठी खापराळे उपकेंद्रातून जोडणी देण्यात आली; मात्र बदलांनंतरही समस्या कायम आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात महावितरणकडे पत्रव्यवहार केला आहे. – विठ्ठलराजे उगले, नगराध्यक्ष