पावसामुळे खड्डे बुजविण्यास अडचणी

पाऊस थांबताच शहर खड्डेमुक्त होणार ः आयुक्त
नाशिक : ुगोरख काळे
नाशिक शहरात यंदा पावसाने तब्बल दोन महिन्यांपासून पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. मध्ये काही दिवस विश्रांती घेतल्याचे सोडून पावसाने यंदा शहराला चांगलेच झोडपून काढले आहे. दरम्यान, सुरू असलेल्या पावसामुळे शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या खड्डे बुजविण्यास अडचणी येत आहेत. जेव्हा पाऊस उघडेल तेव्हाच ते डांबरीकरणाने भरले जातील. सध्या जीएसबीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी म्हटले आहे.
गणेश विसर्जनापूर्वी शहरातील मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी जोरदार तयारी सुरू होती. अगदी पहाटेपर्यंत कामगारांकडून रस्ते खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. यात महत्त्वाच्या मार्गावरील सर्व खड्डे खडी व डांबर टाकून बुजविले गेले होते. पण, त्यानंतर पुन्हा पावसाने मुक्काम ठोकत रोजच जोरदार सरी होत असल्याने यापूर्वी बुजविलेल्या खड्ड्यांतील डांबर व खडी वाहून जात आहे. अनेक ठिकाणी यामुळे खड्डे उघडे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले. यामुळे खड्डे बुजविण्याचा खर्चदेखील पावसात वाहून गेला. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने सर्वच भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आयुक्तांनी याप्रकरणी ठेकेदारांना तंबी देत गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा, असा अल्टिमेटम दिला होता. मात्र, पावसामुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत आहेत. मध्यंतरी जीएसबी मटेरियल टाकून हे खड्डे बुजविण्याचे काम जोरात सुरू होते. परंतु, पावसामुळे पुन्हा खड्डे उखडले जात आहेत. दरम्यान, दुसरीकडे नाशिककरांना खड्ड्यांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे खड्डे भरले कधी जाणार, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. सध्या मात्र पावसाने विश्रांती घेतल्यावरच खड्डे बुजविले जातील, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. पाऊस उघडताच शहरातील रस्ते चकाचक दिसतील, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *