नाशिक

नेत्यांच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हाती भोपळा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गतवैभव संपुष्टात येऊन पक्षाची वाताहत झाल्याचे चित्र नाशिक महानगरपालिका निवडणुकीत दिसून आले आहे. पक्षाने मनपा निवडणुकीत 29 उमेदवारांना उभे केले. त्यापैकी काहींना आयात केले होते. त्या सर्वांना वार्‍यावर सोडून प्रमुख नेते पसार झाले.

नाशिकरोड विभागातून आठ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात प्रभाग 20 मधून संतोष गाडेकर यांच्या पत्नी गायत्री गाडेकर या तुतारी घेऊन उबाठा सेनेच्या उमेदवारांसमवेत रिंगणात उतरल्या. प्रभाग 21 मधून हर्षद निकम, माजी नगरसेवक एस. पी. भालेराव यांच्या स्नुषा अ‍ॅड. स्वाती भालेराव, चंद्रकांत साडे यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट न मिळाल्याने ते ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरले. तर काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते अल्ताफ सय्यद यांनी पत्नी रिजवाना सय्यद यांच्या हाती ऐनवेळी तुतारी देऊन निवडणुकीत सहभाग घेतला. त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनास प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल आणि प्रभारी नाशिकरोड अध्यक्ष राजाभाऊ जाधव आले होते. प्रभाग 22 मधून पक्षाशी एकनिष्ठ असलेले चळवळीतील कार्यकर्ते उत्तमराव बोराडे यांनी अन्सार शेख, माधुरी ओहोळ आणि आणखी एक महिला उमेदवार घेऊन पॅनल जिद्दीने उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या महिला उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतली. तरीही उत्तमराव बोराडे यांनी जिद्द सोडली नाही. अखेरपर्यंत त्यांनी निवडणुकीला सामोरे जात झुंज दिली. विशेष म्हणजे, या सर्व उमेदवारांना पक्षाने कुठलीही मदत केली नाही. गजानन शेलार यांनी देवळाली गावच्या पारावर फक्त एक चौकसभा घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. एवढीच काय ती मदत. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अशोक पाटील मोगल यांनी मात्र या उमेदवारांना धीर देत अखेरपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
नाशिकरोड विभागासाठी नियुक्त केलेला अध्यक्ष प्रभाग 19 मधून पॅनल तर उभा करणे दूरच, पण स्वतःच ऐनवेळी तुतारीची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ निशाणीवर निवडणुकीत उतरला आणि पराभूत झाला. तसाच प्रकार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचा पुतण्या भाजपमध्ये गेला आणि त्यांच्याच प्रभागातून भाजपकडून उभा राहिला. त्यामुळे गजानन शेलार यांनी माघार घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांत यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. अखेर निवडणूक निकाल लागण्यापूर्वी गजानन शेलार यांनी पक्षाकडून मदत झाली नाही, प्रदेश कार्यालयाकडून साधा फोन स्वीकारला गेला नाही, अपमानास्पद वागणूक मिळाली, प्रचारासाठी कोणीही आले नाही, यामुळे त्रस्त होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही आणि गजानन शेलार यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. पक्षाची मात्र वाताहत झाली. आता पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. वसंतराव पवारांच्या नेतृत्वाखाली वैभव शिखरावर होता. डॉ. वसंतराव पवार पक्षाचे शहराध्यक्ष होते. तर अशोक पाटील मोगल नाशिकरोड विभागीय अध्यक्ष होते. त्या काळात नाशिकरोडमधून आठ नगरसेवक महापालिकेत कार्यरत होते. याची आजही सर्वजण आठवण करत आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आ. बाबूलाल आहिरे यांच्या कन्या सरोज आहिरे यांना शरद पवारांनी विधानसभेची उमेदवारी दिली आणि जनतेने त्यांची निवडणूक हाती घेऊन तीस वर्षांची ‘नीळ की गुलाल’ची परंपरा खंडित केली. त्या ‘जायंट किलर’ बनल्या पण पुढे अजितदादा पवार राष्ट्रवादीतून शरद पवार यांना सोडून वेगळे झाले. तेव्हा आ. आहिरेही शरद पवारांना सोडून दादांच्या गटात सामील झाल्या. पण, शरद पवारांची साथ मात्र जनतेने सोडलेली नव्हती. पुढे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील रा.काँ.शरद पवार पक्षाने मोठी मजल मारली आणि शरद पवार युवकांचे श्रद्धास्थान बनले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीत रा.काँ. शरद पवार पक्षाकडे उमेदवारांची गर्दी उसळली. दरम्यान, पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष यांच्यात सुप्त स्पर्धा सुरू होती. विधानसभेसाठी आपापला उमेदवार पदाधिकारीच पुढे करत होते. ज्याला जनाधार नाही, मतदारसंघाची माहिती नाही. केवळ जातीच्या आधारावर आणि शरद पवार पाठीशी आहेत म्हणून उमेदवार तिकीट मागत होते. यात महाविकास आघाडीने मात्र देवळालीची जागा शिवसेनेला सोडली आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील इच्छुकांची निराशा झाली. पण, पक्षाच्या पदाधिकार्‍यांतील शीतयुद्ध कायमच राहिले. दरम्यान, विधानसभेच्या उमेदवारीसाठी एकदा बाळासाहेब सानप व दुसर्‍यांदा गणेश गिते यांना नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी न दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी दिली, पण ते दोघेही पडले आणि पुन्हा काही महिन्यांतच स्वगृही परतले. दरम्यान, पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे निष्ठावान व जिद्दीने तयारी करणारे प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांना उमेदवारीचे आश्वासन देऊनही ऐनवेळी डावलण्यात आले. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत नैराश्य पसरले. काम करणार्‍याला संधी मिळत नाही. ऐनवेळी पक्षात उमेदवार आयात केले जातात. या भावनेने पक्ष कार्यकर्ते खिन्न झाले. राष्ट्रवादीच्या शहर, जिल्हा पदाधिकार्‍यांतही धुसफूस सुरूच होती. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून आलेल्या निधीवरून पक्षात बेबनाव निर्माण झाला होता. पक्षाचे संपर्कप्रमुख माजी आमदार सुनील भुसारा यांच्याकडे तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेही नाशिकहून तक्रारी गेल्या. दरम्यान, जयंत पाटील यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्षपदी माथाडी कामगार नेते आ. शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाली. नाशिकच्या पदाधिकार्‍यांतील बेबनावाची व आपापसातील मतभेदांची सविस्तर माहिती शिंदेंना देण्यात आली. दरम्यान, शहराध्यक्ष हे शहर आणि जिल्हा दोन्हींचा कारभार आपल्याच हाती राहावा असा प्रयत्न करत होते. त्यात जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी त्रस्त होऊन राजीनामा दिला. त्यांच्याऐवजी दत्तात्रय पाटील यांना घेण्यात आले आणि पक्षाच्या गळतीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्यापूर्वी पक्षाने विविध कारणांसाठी केलेले आंदोलन, मोर्चे, कार्यक्रम यावर मात्र पाणी फेरले गेले. कोंडाजीमामांबरोबर काम करणारे तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे यांच्या जागी नवीन अध्यक्ष नियुक्त केले गेले. यामुळे नाशिक तालुक्यात कार्यकारिणी नाही. भगूर, देवळाली कॅम्प येथेही कार्यकारिणी नाही. शहरात बूथ कमिट्या नाही. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. त्यांना सापत्नभावाची वागणूक दिली जाते, अशी भावना निर्माण झाली. सिन्नर, निफाड, त्र्यंबकेश्वर येथेही अध्यक्ष नाही. एकूण काय तर पक्ष संघटन, पक्षवाढीकडे दुर्लक्षच झालेले आहे. यात सुधारणा न झाल्यास पुढे येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत काय होईल? कार्यकर्त्यांच्या बळावर, संघटना शक्तीवर पक्ष चालतो. पण येथे कार्यकर्त्यांनाच नेत्यांनी वार्‍यावर सोडले, त्यामुळे पक्षाची वाताहत होणे स्वाभाविकच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील नेत्यांच्या धरसोड वृत्तीमुळे व कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष यामुळे पक्षात काम करण्यास कार्यकर्ते तयार होत नाहीत. कार्यकर्त्यांच्या कामाचे चीज होत नाही. वर्षानुवर्षे काम करणार्‍या कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी येणार्‍यांना संधी दिली जाते. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. नाशिकमधील जनाधार नसलेले वरिष्ठ नेते पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार नाशिकला आले असता त्यांना आपल्या घरी नेऊन स्वागत करण्यातच धन्यता मानतात. पक्षकार्य तर दूरच राहते. वरिष्ठांना मात्र आपला पक्ष खूप फोफावत आहे, असा गैरसमज निर्माण केला जातो. अशा परिस्थितीत पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी खंबीर नेतृत्व, उत्तम संघटक व त्याला पक्षश्रेष्ठींचा भक्कम पाठिंबा असलेला नेता पुढे येण्याच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते आहेत.

Due to the negligence of the leaders, the NCP’s Sharad Pawar group is in trouble.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago