दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा; निधी वितरित करण्यास मान्यता

जिल्ह्यातील मालेगाव, येवला, सिन्नर तालुक्याचा समावेश

नाशिक: प्रतिनिधी

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली भीषण परिस्थिती लक्षात घेता खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतच्या शासन निर्णय  निर्गमित करण्यात आला.

खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यात जिल्ह्यातील मालेगाव, येवला, सिन्नर या तालुक्याचा समावेश करण्यात आला होता. राज्य शासनातर्फे दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात आली होती. या दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांना आज निधी वितरीत करण्यास मान्यता दिली असून यात मालेगाव तालुक्याला 10892.33 लक्ष तर सिन्नर तालुक्यासाठी 7581.05 लक्ष व येवला तालुक्यासाठी 6333.10 लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता मंत्री दादाजी भुसे यांनी शासन दरबारी मांडली होती तसेच पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली आहे.

शासनाने दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घेण्यास निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना आज दुष्काळ निधी वितरीत करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

मालेगाव तालुक्यातील 10लाख 19 हजार 12 शेतकऱ्यांना या दुष्काळ निधीचा लाभ मिळणार आहे. त्यात 2 हेक्टरच्या आतील 106795.69 इतक्या क्षेत्रावर तर 2 ते 3 हेक्टरच्या 6566.20 क्षेत्रावर दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. शासन निर्णयानुसार, “जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.

शेतकऱ्यांना मदत मिळण्याचे आदेश निर्गमित झाल्यानंतर नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार  तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील  यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *