सिन्नरला उदय सांगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
सिन्नर : प्रतिनिधी
भाजप वगळता सर्वच पक्षांत घराणेशाही आहे. भाजप सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून, कुणा एकाची जहागिरी नाही. भाजपमध्ये काम करणार्या कार्यकर्त्याची कदर केली जाते. सिन्नर तालुक्यात जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम करावे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्था एकहाती ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. जिथे युती होईल तिथे युतीच्या उमेदवाराचे काम करा. सिन्नर तालुक्यात कमळ फुलविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.
सिन्नर येथील आडवा फाटा मैदानावर सोमवारी (दि.3) जोरदार शक्तिप्रदर्शन करीत युवा नेते उदय सांगळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांच्यासह माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यावेळी आयोजित भव्य मेळाव्यात महाजन बोलत होते.
व्यासपीठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, संघटन महामंत्री रवींद्र अनासपुरे, विजय चौधरी, माजी आमदार अपूर्व हिरे, भारत कोकाटे, बंडूनाना भाबड, बाळासाहेब सानप, सुधाकर बडगुजर, विवेक कोल्हे, विजय साने, हेमंत धात्रक, अमृता पवार, भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, विठ्ठल जपे, सजन सांगळे, बाळासाहेब हांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जनता व कार्यकर्ते तयार आहेत. अवघड काहीच नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकहाती सत्ता येऊ शकते. उदय सांगळे हाडाचे व चांगले कार्यकर्ते आहेत, पण पक्ष चुकल्याने ते भरकटले होते. आता भाजपमध्ये प्रवेश करून चांगल्या ट्रॅकवर आल्याचे महाजन म्हणाले.
जमिनीशी जोडून राहा, चांगले काम करा. आता पक्षाने उमेदवारी दिली म्हणजे निवडून आला, अशी पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नसल्याचे महाजन म्हणाले.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली. कोरोना काळात उद्धव ठाकरे घराची पायरी उतरले नसल्याचे म्हणत आता छोट्या राजकुमारला पुढे आणत असल्याचे महाजन म्हणाले. खोटं, पण रेटून बोलणारा सकाळचा भोंगा दोन महिने बंद झाल्याचा टोला महाजन यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.
यापूर्वी माझी जागा कायम पाठीमागे होती. भाजपाच्या रूपाने आता मला पुढची जागा मिळाल्याचे भारत कोकाटे यांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी कायम मोठा भाऊ म्हणून मला साथ द्यावी, तुम्ही कधीही साहेब होऊ नका, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत बंधू मंत्री माणिकराव कोकाटे यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. सोमठाणे गटात आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीत संधी द्यावी, त्याचे सोने करू, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर कुर्हाडे यांनी आभार मानले.
भाजपला व्हिजनरी नेतृत्व मिळाले
उदय सांगळे यांच्या रूपाने सिन्नर भाजपला व्हिजनरी नेतृत्व मिळाल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. 2029 च्या तयारीसाठी पक्ष तुम्हाला सर्व ताकद देणार आहे. 2029 च्या तयारीला पक्ष तुमच्यासोबत असेल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. गावातील युवकांना दिशा देण्याचे काम आणि सबका साथ, सबका विकास करण्याचे काम भाजप करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगळेंचा हा अखेरचा पक्षप्रवेश
उदय सांगळे यांचे भाषण प्रभावी झाल्याचे गिरीश महाजन यांनी सांगत त्यांच्या रूपाने भाजपमध्ये चांगली इन्व्हेसमेंट झाली आहे. त्यामुळे परतावा व्याजासह मिळेल, असे ते म्हणाले. सांगळे यांना भाजपमध्ये राजकीय भवितव्य उज्ज्वल असेल, असे ते म्हणाले. सांगळे यांचा भाजपचा पक्षप्रवेश सोहळा हा शेवटचा पक्षप्रवेश असेल. त्यासाठीच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांना उदय सांगळे यांच्यासोबत पक्षप्रवेश दिल्याचे ते म्हणाले.
मी कुस्तीचा खेळाडू; जंगली रम्मीचा नाही
तालुक्यातील परिस्थितीमुळे आपल्याला पक्षांतरे करावी लागल्याचे उदय सांगळे यांनी सांगितले. आपली लढाई विस्थापित विरुद्ध तालुक्यातील दोन प्रस्थापित अशी असल्याचे ते म्हणाले. आपण एकटे लढलो. दोघांनी आपसात मुरा कुस्ती केली. तरीही कायर्कर्त्यांच्या जोरावर आपल्याला लाखभर मते मिळाली. निवडणूक हरलो असलो तरी मनाने हरलो नसल्याचे सांगळे म्हणाले. मी कुस्तीचा खेळाडू आहे; जंगली रम्मीचा खेळाडू नाही, असा टोला सांगळे यांनी लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण तालुक्यात भाजप आणि कमळ चिन्ह घरोघरी पोहोचवू, असे आश्वासन सांगळे यांनी पक्षश्रेष्ठींना दिले.
यांचा झाला भाजपात प्रवेश
या कार्यक्रमात उदय सांगळे यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, संजय सानप, पंचायत समितीचे माजी उपसभापती संग्राम कातकाडे, दीपक बर्के, जगन पाटील भाबड, पंचायत समितीच्या माजी सभापती रोहिणी कांगणे, माजी सदस्या स्वप्नाली सोनवणे, बाजार समिती संचालक नवनाथ घुगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. संजय सोनवणे, शिवसेनेचे आबा खैरनार, अनिल सरवार, विनोद शितोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…