समृद्धी महामार्गावर पहाटे काळाचा घाला!

एमजी हेक्टरची धडक; मालेगावचा तरुण ठार

सिन्नर : प्रतिनिधी
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच सिन्नर तालुक्यातील सोनारी शिवार (चॅनल क्र. 578) येथे मंगळवारी (दि. 30) पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. एमजी हेक्टर कारने पुढे जाणार्‍या अज्ञात वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेत कारमधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले.
या अपघातात सूरज भागचंद मांडवले (वय 30, रा. रामनगरी, मालेगाव कॅम्प) याचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. मुंबईकडून सिन्नरच्या दिशेने येणारी एमजी हेक्टर कार (क्र. 41 5959) पुढे जाणार्‍या वाहनाला धडकल्याने ही दुर्घटना घडली.
अपघातात कारमधील सूरज मांडवले, अजय लिंबा अहिरे आणि संग्राम सावंत हे तिघेही जखमी झाले. तातडीने त्यांना उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सूरज मांडवले यांची प्राणज्योत मालवली. अजय अहिरे व संग्राम सावंत यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
सूरज मांडवले यांचा साला नेव्हीत भरती झाल्याने त्याला सोडविण्यासाठी हे तिघे तरुण मुंबईला गेले होते. परतीच्या प्रवासात समृद्धी महामार्गावर हा दुर्दैवी अपघात घडला. घराकडे परतणारा आनंदाचा प्रवास काळाने हिरावून घेतल्याने मालेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुहास गोसावी पुढील तपास करीत आहेत.

Early morning on the Samruddhi Highway!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *