अभिनय , लेखनातील सहजता  मार्गदर्शनामुळे शक्य :अभिनेते दिलीप प्रभावळकर

नाशिक : प्रतिनिधी

अभिनय क्षेत्रात करिअरला सुरूवात करण्याआधी मी कंपनीत काम करत होते. माझा अभिनय आणि लेखन चांगले होण्यास दिग्दर्शक आणि संपादकांचा वाटा आहे.मला कोणताही अनुभव नसताना मी  वेळी वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे अभिनय आणि लेखन खुलत गेले आणि यश मिळाले. माझे आतापर्यंतचे लेखन, अभिनय यांत सहजपणा आला तो अनेकांच्या मार्गदर्शनाचाच भाग आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांनी केले.

मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहास शनिवारपासून प्रारंभ झाला. या सप्ताहाचा प्रारंभ स्व. अन्नपूर्णा डोळे स्मृती मुलाखतीने झाला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत प्रा. अनंत येवलेकर आणि अपर्णा वेलणकर यांनी घेतली. यावेळी दिलीप प्रभावळकर यांनी सुरुवातीच्या नोकरीच्या कार्यकाळापासून ते आताच्या गंगाधर टिपरे मालिकेपर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला. अगदी सुरुवातीला अनंत अंतरकरांनी माझ्यात लिहिण्याचा विश्वास दिला. त्यानंतर रेडिओसाठी श्रृतिका, बोक्या सातबंडे ही कथा लिहिली. यात काहीसे यश आल्यानंतर अभिनयाकडे वळालो. त्याआधी पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यातील लेखक आणि अभिनेता घडत गेला. विनायक चासकर यांच्यामुळे मी चिमणराव भूमिका केली, असे म्हणता येईल. या भूमिकेमुळे मला अभिनयात सिद्ध करण्याची आणि माणूस शोधण्याची कला अवगत झाली. चिमणरावांच्या भूमिकेमुळेच मी घराघरात पोहोचलो. अशाच हसवाफसवीमुळेही मला प्रसिद्धी मिळाली. ही भूमिका माझे वडील पाहू शकलो नाही, याचे वाईट वाटते. कारण नोकरी सोडून अभिनयात जाण्याचा सल्ला वडिलांनीच दिला होता. प्रभावळकर यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातील उताराच यावेळी त्यांनी वाचून दाखविला. एकूणच लेखन असो वा अभिनय मी ठरवून कधीच केले नाही. माझ्याकडून होत गेले आणि त्यात यशस्वी झालो, इतकेच सांगता येईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय करंजकर यांनी केले तर जयप्रकाश जातेगावकर यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवद्त्त जोशी यांनी तर प्रेरणा बेळे यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, प्रा. सुनील कुटे, कार्यवाह धर्माजी बोडके, ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर, गिरीश नातू, ॲड. अभिजित बगदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *