शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचा आनंदोत्सव भाजपाने साजरा केला. देवेंद्र फडणवीस परत एकदा मुख्यमंत्री होतील, हाच त्या आनंदोत्सवाचा अर्थ होता. घडले उलटे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि इच्छा नसतानाही फडणवीस यांच्यावर शिंदेंचे डेप्युटी म्हणजेच उपमुख्यमंत्री होण्याची नामुष्की आली. याचमुळे नवीन सरकार स्थापन झाल्याचा आनंदोत्सव भाजपाला भव्यदिव्य स्वरुपात साजरा करता आला नाही. भाजपा कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली. सरकारबाहेर राहून राज्याच्या कारभारावर फडणवीस लक्ष ठेवतील, असे ठरले असताना अचानक त्यांना डेप्युटी करण्यात आले. त्यांनी अत्यंत घाईने आणि नाखु़शीने शिंदेंनंतर शपथ घेतली. यावर बरेच चर्वितचर्वण झाले. फडणवीस यांचे अवमूल्यन झाल्याची टीकाही झाली. खुद्द फडणवीस यांनी केलेले खुलासे सारवासारव करणारे होते. खरा खुलासा महाराष्ट्र प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. मनावर दगड ठेवून भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला दु:ख झाले, अशी कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली. याचा सरळ अर्थ भाजपाचा मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्याची नेपथ्यरचना करण्यात आली होती. परंतु, ऐनवेळी रंगमंच बदलण्यात आला. यामागे विविध कारणे दिली जात असली, तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना शह देण्यासाठी आणि बंडखोर आमदारांना विश्वास देण्यासाठी भाजपाने ही खेळी केली असल्याचा निष्कर्ष काढला गेला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, या दु:खातून भाजपा कार्यकर्ते सावरलेले नाहीत. हेच सत्य चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पनवेलमध्ये कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचे उद्घाटन करताना कथन केले. सन २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला बहुमत मिळूनही शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. शिवसेनेने यावेळी विश्वासघात केल्याचा दावा भाजपाकडून आजही केला जात आहे. त्यावेळी सत्तेपासून वंचित राहिल्याचे दु:ख भाजपाला सोसवत नव्हते. त्याचमुळे महाविकास सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. एकनाथ शिंदेंसारखा गडी हाती लागल्याने सरकार पाडता आले. हेही तितकेच सत्य.
स्थिरता देणारा नेता
कोरोना काळात जनतेचे झालेले हाल, सरकारविरोधात टिप्पणी करणार्यांना तुरुंगवास, मंद विकासगती इत्यादी कारणांनी राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती. तसा बदल झाला. पण, बदल होत असताना योग्य संदेश जाईल आणि चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल, असा एक नेता देण्याची गरज होती. त्यामुळे मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय काढायचा? चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल, असा नेता म्हणजे एकनाथ शिंदे हाच अर्थ? फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा अनुभव असतानाही ते चांगल्या निर्णयांना स्थगिती देऊ शकले नसते काय? फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे सरस आहेत काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पाटील यांच्या भाषणातून भाजपात सर्वकाही आलबेल नाही, हा संदेश लोकांपर्यंत पोहचला गेला आहे. म्हणूनच त्यांच्या भाषणाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ काढून टाकण्यात आला आहे. “मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपल्या सर्वांना दु:ख झाले.” या विधानाचा अर्थ म्हणजे शिंदेंना मुख्यमंत्री करण्याच्या निर्णयात फडणवीस यांचाही सहभाग होता, असाच निघतो. फडणवीस यांचा सहभाग असण्याविषयी तीळमात्रही शंका नाही. मात्र, सरकारमध्ये जाण्याची त्यांची इच्छा नव्हती, तर बाहेर राहून रिमोट कंट्रोल आपल्या हातात त्यांची इच्छा होती. परंतु, केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतल्याने त्यांनाही मनावर दगड ठेवून सरकारमध्ये सहभागी व्हावे लागले. असाही अर्थ आता काढला जाऊ शकतो. कार्यकर्त्यांना झालेले दु:ख पाटलांनी बरोबर ओळखले. परंतु, फडणवीस यांनी आपल्या मनात जे दु:ख दडवून ठेवले आहे. त्यावर पाटलांना फुंकर मारता आलेली नाही.
त्यागाच्या तयारीचा सल्ला
पाटलांचे सत्यकथन भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला पटलेले नाही म्हणूनच त्यांच्या भाषणाचा सोशल मीडियावरील व्हिडिओ काढून टाकण्यात आला. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पत्रकार किंवा मीडियाला प्रवेश नसतो. तरीही पाटलांच्या भाषणाचा व्हिडिओ बाहेर कसा आला? हा प्रश्न आहे, हा आमचा अंतर्गत प्रश्न असून तो सोडविला जाईल, असा खुलासा आमदार आशिष शेलार यांनी करुन सारवासारवही केली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याने दु:ख झाल्याचे मत प्रदेशाध्यक्षांचे नाही, तर त्यावेळच्या घडामोडी व प्रसंगाबाबत कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ त्यांनी व्यक्त केल्याची टिप्पणी शेलार यांनी करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनीही सारवासारव केली. राजकीय घडामोडींच्या काळात भाजपाचा मुख्यमंत्री होणार, असे वातावरण होते. परंतु, शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय अचानक झाल्याने पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यावर वेगळे अर्थ लावले जात आहेत, अशी टिप्पणी फडणवीस यांनीही केली. मात्र, फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मनावर दगड ठेवण्याचा सल्ला वेगळ्या भाषेत दिला. राज्यात पुन्हा सत्ता आल्याने भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना पदाची आस लागली आहे. हेच ओळखून त्यांनी कार्यकर्त्यांना त्यागाची तयारी ठेवण्याचा संदेश दिला आहे. अनेक नेते आणि कार्यकर्ते चांगले काम करीत असून, मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यपाल नियुक्त बारा आमदारांमध्ये आपल्याला स्थान मिळेल, असे त्यांना वाटत आहे. पण, शिवसेनेबरोबर (एकनाथ शिंदे गट) सत्तेत असल्याने त्यांनाही काही वाटा द्यावा लागेल आणि पदांना मर्यादा आहेत. त्यामुळे फार काही अपेक्षा ठेवता येणार नाहीत. त्यागाच्या भूमिकेतून काम करीत राहण्याचा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. हाच मनावर दगड ठेवण्याचा सल्ला!