एल्बो डिसलोकेशन

डॉ. संजय धुर्जड

 

 

 

जेव्हा आपण पडतो तेव्हा नकळतपणे स्वतःला सावरण्यासाठी किंवा बचावासाठी आपले हात पुढे येतात. याला रिफ्लेक्स ऍक्शन असे म्हणतात. साहजिकच जेव्हा आपण पडत असताना आपले तळहात शरीराच्या आधी जमिनीला टेकतात. त्यामुळे शरीराचा संपूर्ण भार हातांवर येतो, म्हणून हाताच्या विविध भागांना इजा होऊ शकते. त्यातीलच एक इजा म्हणजे एल्बो डिसलोकेशन. म्हणजेच कोपर्‍याचा सांधा निखळणे किंवा सरकणे. हे नेमके कसे होते, ते कसे ओळखावे, तातडीचा उपाय काय, शास्त्रीय उपाय काय आहे आणि याचे अपाय काय आहेत, हे जाणून घेणार आहोत.

 

 

कोपर्‍याचा सांधा निखळल्यास संध्यात असह्य वेदना होतात. पडताना कोपर्‍यात आवाज येतो. सांधा सरकल्याचेही जाणवते. जराही हालचाल झाली तरी वेदनेची सनक येते, म्हणून रुग्ण त्याचा हात पोटाशी किंवा छातीशी घट्ट पकडून ठेवतो. कोपर्‍याचा सांधा काटकोनात वाकवलेला असतो व त्याभोवती सूज आलेली असते. अशा वेळी हाताची अधिक हालचाल करू नये. दोरी, टॉवेल, स्कार्फ, दुपट्टा यासारख्या वस्तूंनी हात गळ्यात बांधावा. हाताला इतर ठिकाणी मार लागेलला आहे की नाही, बाह्य जखमा आहेत की नाही, याची माहिती घ्यावी. जवळच्या हॉस्पिटलला घेऊन तिथे प्रथमोपचार करावा. उपचारासाठी मात्र अस्थिरोग तज्ज्ञांकडेच न्यावे, कारण याच्या उपचारासाठी कौशल्य लागते. हॉस्पिटलला नेण्यापूर्वी रुग्णाला जेवण, पाणी असे तोंडाने काहीही देऊ नये. अगदीच चक्कर, अशक्तपणा वाटल्यास तोंड ओले करण्यापुरते पाणी द्यावे (50 मिलीपेक्षा कमी).

 

 

एल्बो डिसलोकेशन ही एक इमर्जन्सी असते. जरी जीविताला धोका नसला तरी निखळलेला सांधा लवकरात लवकर जागेवर बसवला तर पुढील गुंतागुंत टळते. याकरिता, रुग्णाला तोंडाने काहीही देऊ नये, जेणेकरून त्याला तात्काळ भूल देऊन सांधा बसवला जाऊ शकतो. सांधा जागेवर बसवल्यानंतर त्याला जागेवर ठेवण्यासाठी प्लास्टर केले जाते. पुढील तीन आठवडे हाताला प्लास्टर करून गळ्यात बांधला जातो. सांधा निखळल्याने सांध्यांचे दोन्ही हाडे जागेवर धरून ठेवणार्‍या लिगामेंट आणि जॉईंट कॅप्सूल तुटतात. दोन्ही हाडे एकमेकांपासून दूर गेल्याने सांध्यांभोवती अशा इजा होतात. सांधा जागेवर आल्याने लिगामेंट आणि कॅप्सूल जवळ येतात. तीन ते चार आठवड्यांमध्ये या आतील जखमा भरतात. लिगामेंट आणि कॅप्सूल रिपेअर होणे आवश्यक असते, जेणेकरून भविष्यात तो सांधा पुन्हा निखळणार नाही. तीन आठवड्यांनंतर हळूहळू सांध्याची हालचाल करण्यास सुरुवात केली जाते. फिजिओथेरपीस्ट सारख्या तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आणि ऑर्थोपेडिक सर्जनच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावे.

 

 

कुठल्याही प्रकारचे अघोरी उपचार करू नये. मोडक्यांकडे जरी कमी पैशात उपचार होत असले, तरी शास्त्रशुद्ध पद्धतीचे उपचार नसल्यामुळे सांध्याला अपाय होऊ शकतो. योग्य उपचार न झाल्याने अपेक्षित परिणाम मिळाले नाही तर मोडक्या बाबाला कुणी जाब विचारायला जात नाही. अशा वेळी मग डॉक्टर आठवतो. एक्स-रे करणे आवश्यक असते.

 

 

सांधा सरकलेला असतांना त्यासोबत फ्रॅक्चरही असू शकते. त्यानुसार उपचाराची पद्धत ठरते. ऑपरेशन लागणार आहे, किव्हा फक्त भूल देऊन सांधा बसवणे याचा योग्य निर्णय घेऊन उपचार व्हायला हवा. फिजिओथेरपी आणि व्यायाम करणे हा उपचाराचाच भाग आह. केवळ ऑपरेशन केले आणि व्यायाम नाही केले तर अपेक्षित रिझल्ट मिळणार नाही. सांध्याची पूर्ण हालचाल झाली नाही तर भविष्यात काम करण्यास अडचण होते, कायमचे अपंगत्व येते.

डॉ. संजय धुर्जड

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *