नाशिक : प्रतिनिधी
इयत्ता 11 वी प्रवेशाच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, नाशिकमधून तब्बल 371 शाळा -महाविद्यालयांनी या सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यात शहरातील 150 हून अधिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांच्या समावेश आहे. शहरात अकरावीच्या 26000 जागा असतील. या संस्थांनी शिक्षण विभागाच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेंतर्गत ऑनलाइन नोंदणी केली आहे. आता 16 मेनंतर विद्यार्थ्यांचे लॉग इन ऑनलाइन उपलब्ध होणार असून, आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांत प्रवेशासाठी ऑनलाइन प्राधान्यक्रम (फ्रिफरन्स) नोंदविता येणार आहे. त्यासाठी 10 महाविद्यालयांचा पर्याय त्यांच्यासाठी असेल.
अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया शहरात आधीपासूनच होती. ग्रामीण भागात यंदा प्रथमच होत आहे. त्यामुळे सरसकट सर्वच शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांची अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली जात आहे. यामध्ये शहरातील तब्बल दीडशेपेक्षा अधिक शाळा-महाविद्यालयांचा समावेश आहे. तर ग्रामीण मधील 200 पेक्षा अधिक शाळा-महाविद्यालयांनी यात नोंदणी केली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
89,860 जागा या जिल्ह्यातील आहे. त्यापैकी सीबीएसई आणि आदिवासी विकास विभागाच्या शाळांमधील जागा या कमी होतील. त्यानुसार उपलब्ध महाविद्यालये आणि त्यांच्याकडील उपलब्ध जागा या लागलीच शुक्रवारी (दि.16) सायंकाळपर्यंत निश्चित केल्या जाणार आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना त्यानंतरच प्रवेशासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी स्पष्ट केले.