नाशिक : प्रतिनिधी
रिअल इस्टेट उद्योग हे रोजगार निर्मिती करण्यात देशातील दुसर्या क्रमांकाचे क्षेत्र असून नाशिकमध्येही सुनियोजित विकासाच्या अपरिमित संधी आहेत. युनिफाईड डीसीपीआर लागू झाल्यापासून बांधकाम क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली आहे. त्याचा लाभ ग्राहक व विकासक या दोघांनाही झाला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे आयोजित शेल्टर या गृहप्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदघाटन करण्यात आले.
उदघाटनाला पालकमंत्री दादासाहेब भुसे, खा. हेमंत गोडसे, मनपा आयुक्त डॉ.सी.एल पुलकुंडवार, क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष सुनील फुरदे, महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, मानद सचिव गौरव ठक्कर, शेल्टरचे समन्वयक कृणाल पाटील, ललित रूंग्ठा, ईशा चंदे, जेएलएलचे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक करण सिंग सोडी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, सर्वांच्या हिताचे निर्णय त्वरित घेण्यासाठी शासन अग्रक्रमाने काम करीत असून प्रलंबित मुद्द्यांवर पण लवकरच निर्णय घेण्यात येईल नाशिक पुणे रेल्वे मार्ग, आऊटर रिंग रोड असे असे नाशिकच्या विकासाला चालना देणार्या प्रकल्पास देखील गती देण्यात येईल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते नाशिक फाईनेस्ट एज्युकेशन हब ऑफ इंडिया या सर्व्हेचे अनावरण करण्यात आले.
पालकमंत्री दादासाहेब भुसे म्हणाले की येत्या काळात सर्व घटकांना एकत्र करून शहराच्या विकासाचा एक नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार असून आगामी कुंभमेळ्यासाठी सर्व संबंधित विभागाकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या आराखड्यासाठी क्रेडाई ने सहकार्य करावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. प्रस्तावित आऊटर रिंग रोड साठी हैदराबाद च्या बाहेरील विकसित झालेल्या रिंगरोड चा देखील अभ्यास करण्याचे त्यांनी सूतोवाच केले. या प्रसंगी उपस्थित खा. हेमंत गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना नाशिक च्या पुढील विकासाच्या रोड मॅप मधील मुद्दे मांडले. आपल्या भाषणात मनपा आयुक्त डॉ. सी एल पुलकुंडवार म्हणाले की, नाशिकच्या अर्थव्यवस्थेला शेल्टर मुळे चालना मिळेल. प्रास्ताविकात क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवि महाजन म्हणाले की विचार समृद्धीचा .. पत्ता नाशिकचा’ नाशिक नेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित या घातलेल्या अनेक नवीन योजना आणि प्रकल्पामुळे नाशिक मध्ये आज रियल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात नक्की फायदेशीर ठरणार आहे., बांधकाम परवानग्यासाठी ऑनलाईन सोफ्टवेअर च्या अडचणी दूर व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतांना समृद्धी महामार्गाला नाशिक ने प्रभावीपणे जोडावे तसेच रॉयल्टीचे नियम सुटसुटीत करावे, अशी मागणीही केली.
अनंत राजेगावकर म्हणाले की, शहराच्या बाहेरील भागात पण विकास व्हावा यासाठी क्रेडाई प्रयत्नशील आहे. शेल्टरचे समन्वयक कृणाल पाटील यांनी गृह प्रदर्शनाच्या इतिहासत शेल्टर 2022 हे प्रदर्शन सर्वात भव्य म्हणून ओळखले जाईल, असे सांगितले. शेल्टर यशस्वी होण्यासाठी अनंत राजेगावकर, जितुभाई ठक्कर , सचिव सुनील कोतवाल, किरण चव्हाण , सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार , उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकणी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत
प्रदर्शनास मोफत प्रवेश
शेल्टर प्रदर्शनास भेट देण्यासाठी दर्शकांना ऑनलाइन नोंदणी केल्यास मोफत प्रवेश देण्याचे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जाहीर करण्यात आले आहे. या साठी फक्त क्यु आर कोड स्कॅन करून आपली माहिती भरल्यास एन्ट्री पास त्या दर्शकाच्या मेल वर येईल. या आधी अशा ऑनलाइन नोंदणीची मुदत 21 नोव्हेंबरपर्यंत होती. पण त्याची मागणी बघता त्याची मुदत प्रदर्शन कालावधीपर्यंत म्हणजे 28 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.