काही माणसांचा चेहरा सतेज आणि ऊर्जेने ओतप्रोत असतो कारण ती माणसं स्वतःमध्ये ऊर्जा साठवतात आणि ताण-तणावांवर संकटांवर मात करून अजून ऊर्जावान होत असतात या सगळ्या सकारात्मकतेचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो आणि काही माणसांचा चेहरा अती-विचार , चिंता यामुळे ओढलेला आणि उदास वाटतो कारण ती माणसं सगळं आपल्या मनाजोगं , मनासारखं व्हावं म्हणून अतोनात कष्ट घेऊन आपल्या शरीराची, मनाची बहुमूल्य ऊर्जा नष्ट करत असतात त्यामुळे नकळतच ह्याचा विपरीत परिणाम शरीर-मनावर होत असतो मग माणसं आपली वागणूक बदलतात , त्यांचे ताण-तणाव वाढत जातात तस-तसे विपरीत परिणाम सहन करायला त्यांची अजून अतिरिक्त ऊर्जा खर्च होत असते .
ह्या स्थितीवर मात करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे आपल्यातल्या ऊर्जेची साठवण करायची . आपल्यासाठी असलेले ऊर्जेचे स्त्रोत नेमके कोणकोणते आहेत त्यांना ओळखून दैनंदिन उपयोगात आणलं तर केवळ शरीरच नाही तर आपलं मन सुद्धा ऊर्जावान होईल आणि येणाऱ्या संकटांवर ताण-तणावांवर मात करण्याची शक्ती ही आपल्याला मिळेल .
आपल्या शरीराला मिळणाऱ्या ऊर्जेचे तसे पाहिले तर चार स्त्रोत आहेत .
एक म्हणजे – आपला योग्य प्रमाणात आहार ,
दुसरा स्त्रोत – योग्य प्रमाणात झोप , ज्यामुळे आपल्या सगळ्या अवयवांना नैसर्गिक विश्रांती मिळते.
तिसरा स्त्रोत – ज्ञान घेणे , ज्ञानामुळे आपण कोणतीही परिस्थिती, घटना, प्रसंग,भावना यामुळे समाधानी आणि आनंदी होतो .
चौथा स्त्रोत – प्राणशक्ती अथवा आत्मबल ज्यामुळे आपण आपल्या श्वासांच्या प्रती सजग होतो . आपण जीवनाकडे सकारात्मकतेने पाहतो मग आपल्याला जगण्याची योग्य दिशा प्राप्त होते .
खरंतर आपले मन हे आपल्या शरीराच्या ऊर्जेचे एक शक्तीगृह आहे… जे आपल्या शरीरातल्या सूक्ष्म धमन्यांच्या माध्यमाने आपल्याला संकेत पाठवते आणि शरीर त्यानुसार कार्य करते.
आपल्या शारीरिक ऊर्जेचे कितीतरी स्तर असतात . आपण खातो ते जेवण , पितो ते पाणी , श्वास रुपात घेत होती हवा , ऊन या सगळ्यांमुळे शरीरात ऊर्जेची साठवण होते . जर आपल्याला आपल्या जीवनाचा स्तर उंचावयाचा असेल तर ; आपल्याला उच्च गुणवत्तेची ऊर्जा लागते .
आपण प्रत्येकजण हे अनुभवत असतो की , ज्या दिवशी आपण खूप आनंदी आणि खुश असतो , प्रसन्न असतो त्या दिवशी आपण अधिक ऊर्जावान होतो , आपल्याला उत्साह वाटतो आणि एखाद दिवशी आपल्याला निराशा उदासी असेल तर तितकंसं ऊर्जावान उत्साही वाटत नाही ; म्हणून तर आपण जितके शांत संयमी आणि आनंदी असू तेवढी जास्त ऊर्जेची साठवणूक आपण आपल्यात करू शकतो .
अती विचार आणि गरजेपेक्षा जास्त विचार , चिंता यामुळे आपली भरपूर शारीरिक आणि मानसिक ऊर्जा खर्च होत असते मग हे अती विचार थांबवायचे कसे ? त्यासाठी आपल्याला स्वतःला शिस्त लावावी लागेल . मनःशांतीसाठी प्राणायाम , ध्यानधारणा हे उपाय सगळ्यात महत्त्वाचे ! जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा त्या श्वासासोबत आपण ताजी हवा आत घेतो म्हणजेच आपण निसर्गातील सकारात्मक ऊर्जा आत घेतो आणि अशुद्ध हवा बाहेर टाकतो म्हणजे आपल्यातली नकारात्मकता आपण बाहेर टाकतो . आध्यात्मिक बैठक वा चिंतनाने आपल्या मनात ऊर्जेची साठवण होते आणि मन:शांती मुळे आपण ही ऊर्जा आपल्या प्राणात साठवतो कारण मनुष्याच्या शरीरामध्ये मनाची ऊर्जा अनंत आहे . जसा-जसा आपला शारीरिक विकास होतो तशी-तशी आपल्यातल्या ह्या ऊर्जेची साठवणूक निरंतर वृद्धिंगतच होत असते आणि आपण तर सर्वसामान्य माणसे आहोत आपण ही साठवलेली ऊर्जा आपलं घर , परिवार संसारासाठी खर्च करतो आणि जे ब्रह्मचारी, संत-महात्मे असतात ते आपल्यातल्या ह्या ऊर्जेमुळे साधनेकडे वळतात .
आपली मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि तिची साठवणूक करण्यासाठी आपण भूतकाळात अडकून न राहता वर्तमानावर आपलं लक्ष केंद्रित करून ध्यानधारणेने मन:शांती मिळवून आपण ऊर्जावान होतो आणि सकारात्मकतेने आपलं जगणं अजून अमूल्य करू शकतो…!
या सगळ्या अखिल विश्वाची निर्मिती ध्वनी पासून झालीय , ध्वनीचं महत्त्व खूप आहे . जसे की ढग गरजणे , वाहत्या पाण्याचा खळखळ आवाज , पावसाचा टप-टप संगीत , झाडाच्या पानांचा सळसळ आवाज अशा कितीतरी ध्वनी म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे म्हणून तर दिवसभरात केव्हा तरी सायंकाळी वा झोपण्यापूर्वी झोपताना आपल्याला समाधान देणारं आवडणारं छानसं हलकाफुलकं संगीत ऐकावं ही साऊंड थेरेपी जरूर घ्यावी अगदी चहाच्या कपासोबत बाल्कनीतल्या झुल्यावर बसून असं संगीत ऐकताना आपण एका वेगळ्याच जगात जातो आणि अशावेळी नकळत आपण स्वतःत ह्या अनमोल ऊर्जेची साठवणूक करत असतो पण माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ‘आळस’ ! आळशी व्यक्तीकडे वेळ तर असतो पण तो त्या वेळेचा कधीच सदुपयोग करत नाही मग तणाव, चिंता वाढत जातात , थकवा येतो अशा व्यक्तीच्या ना बोलण्यात उत्साह असतो ना वागण्यातही ; शिवाय आळशी प्रवृत्तीमुळे मग जेवणाची वेळ-अवेळ , बेफिकीरपणा , जागरण अति आणि अयोग्य आहार ; त्यामुळे ओघानेच मनातही नकारात्मकता येते .
जेव्हा आपलं मन प्रलोभनं , उत्तेजनांपासून मुक्त होईल ; शांत होईल तेव्हा कुठे आपलं ध्यान एकाग्र आणि केंद्रित होईल मग आपल्यातल्या अंतरिक ऊर्जेची केलेली साठवण नक्कीच एखाद्या विद्युतभारीत शक्तीत परावर्तित होईल जी शक्ती म्हणजे आपल्यातला निखळ सळसळता उत्साह , कार्यतत्परता , नवे काही करण्याची उमेद ; जी पुनः पुन्हा नव्या ऊर्जेत परावर्तीत होत राहिल आणि मग आपण असू निरंतर उत्साही , आनंदी आणि ऊर्जावान..!
©️अलका कुलकर्णी