नाशिक ः देवयानी सोनार
आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन पिढीला दागिन्यांचे डिझाइन, तसेच बांबूपासून शोभेच्या टिकाऊ वस्तू आदी बनविण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मेळघाटातील वेणुशिल्प औद्योगिक सहकारी संस्था, लवादा (जि. अमरावती) येथील महिलांनी कार्यशाळेत 12 महिलांना धडे दिले. यासाठी मार्गदर्शक डिझाइन नॉन स्टॉप नाशिक यांचे सहकार्य व अर्थसहाय्य शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक यांनी केले आहे.
लोप पावत चाललेल्या आदिवासी कलाकुसरीला नवसंजीवनी देत मेळघाटातील महिलांना उद्योजकतेचे धडे देण्यासाठी नाशिक येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कालिका मंदिर ट्रस्ट येथे दि. 16 ते 19 ऑगस्टदरम्यान झालेल्या या कार्यशाळेत वेणुशिल्प औद्योगिक सहकारी संस्था, लवादा (जि. अमरावती) येथील प्रशिक्षक महिलांनी 12 आदिवासी महिलांना पारंपरिक दागदागिने, तसेच बांबूपासून शोभेच्या वस्तू व टिकाऊ साहित्य बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
या उपक्रमासाठी नॉन स्टॉप नाशिक या डिझाइन मार्गदर्शक संस्थेचे सहकार्य लाभले आहे. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक यांनी अर्थसहाय्य केले आहे. भिलाला समाजातील महिलांना बीड्स व मण्यांपासून गळ्यातील हार, नक्षीकाम असलेले दागिने, तसेच बांबूपासून परडी, ज्वेलरी बॉक्स, वॉल हँगिंग, शोभेच्या लायटिंग माळा आदी वस्तू बनविण्याचे धडे देण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांबूच्या सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी असल्याने या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पारंपरिक कलाकुसरीला बाजारपेठ मिळावी आणि नवीन पिढीला या कलेची ओळख व्हावी, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे, असे संस्थेच्या निरुपमा देशपांडे यांनी सांगितले.
मेळघाटातील 36 गावांत अशा कार्यशाळा घेण्याचे नियोजन असून, त्याची सुरुवात चित्री गावातून झाली. महिला प्रशिक्षण घेत असून, पारंपरिक कलेसोबत आत्मनिर्भरतेचाही मार्ग खुला होत असल्याचे संस्थेच्या सचिव चंदा कनोजे यांनी सांगितले. आज (दि. 19) या कार्यशाळेचा शेवटचा दिवस आहे. गणेशोत्सवासाठी लागणार्या सजावटीच्या वस्तू, बांबूची चटई, शोभेच्या इलेक्ट्रिक लायटिंग माळा, ज्वेलरी बॉक्स, परडी, भिंतीवरचे वॉल हँगिंग आदी बनविण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगार, तसेच पारंपरिक वस्तूंच्या बाजारपेठेला चालना मिळणार आहे. आगामी सणांना बांबूच्या वस्तूंना मागणी असल्याचे संस्थेच्या निरुपमा देशपांडे यांनी सांगितले.
या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगार, तसेच पारंपरिक वस्तूंच्या बाजारपेठेस चालना मिळणार आहे. आगामी सणांना बांबूच्या वस्तूंना मागणी वाढणार आहे.
– निरुपमा देशपांडे, वेणुशिल्प औद्योगिक सहकारी संस्थाया कार्यशाळेत बीडस्चे प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन पिढीला या डिझाइन माहिती व्हाव्यात, यासाठी प्रशिक्षण आयोजित केले आहे. मेळघाटातील 36 गावांत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. भिलाला समाजातील महिलांचे प्रशिक्षण चित्री गावातून सुरू केले आहे. लवादा व इतर गावांत महिला प्रशिक्षण घेत आहेत. महिला उत्साहाने आमच्याशी जोडल्या जात आहेत.
– चंदा कनोज, सचिव, मेळघाट वेणुशिल्प औद्योगिक सहकारी संस्था