पर्यावरण संवर्धन काळाची गरज

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती’
संत तुकाराम महाराजांनी 16 व्या दशकात वृक्षांचं महत्त्व अगदी सोप्या भाषेत सांगितले, वृक्ष म्हणजे जणू काही आपले सगेसोयरे आहेत. त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे, संवर्धन केले पाहिजे हे 400 वर्षांपूर्वी सांगितले होते तरीही आजही बर्‍याच लोकांना पाहिजे तितके वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजलेले नाही, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन काळाची गरज बनली आहे. त्याची जनजागृती होणे गरजेचे आहे. पर्यावरण म्हणजे नेमकं काय? तर, सर्व सजीवांचा नैसर्गिक परिसर म्हणजेच पर्यावरण. पर्यावरण संवर्धनासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, कारण या उन्हाळ्यात तापमान 45 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलेले आपण बघितले आहे. हे तापमान जर कमी करावयाचे असेल तर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला वेगळं काहीच करण्याची गरज नाहीये. फक्त आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला प्रत्येकाने एकच वृक्ष लावायचा आहे व तो जगवायचा आहे. म्हणजे आपल्या देशात जवळपास 130 कोटी लोकसंख्या आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला 130 कोटी वृक्षांची पर्यावरणात भर पडेल. दुसरं प्रत्येक व्यक्ती जेव्हा या जगाचा निरोप घेतो त्या व्यक्तीची आठवण एक चिरा, एक स्मारक म्हणून एक वड किंवा पिंपळ वृक्षाची लागवड करायची व त्यांचे संवर्धन करायचे. तिसरं प्रत्येक मुलीचा विवाह होतो तेव्हा तिने माहेरी तिची कायमची आठवण म्हणून एक वृक्ष लावायचा आहे आणि चौथे कोणालाही कोणत्याही कार्यक्रमात मग तो कार्यक्रम वर्षश्राद्ध असो, गंगापूजन असो, वाढदिवस असो, विवाह असो किंवा जागरण गोंधळ असो, शाल, टोपी देण्याऐवजी एक वृक्ष भेट द्यायचा ( शाल, टोपी एक सन्मान म्हणून एका कार्यक्रमात सर्वांनी मिळून एक देण्यास हरकत नाही ) असं जर प्रत्येकाने मनाशी ठरविले पर्यावरणात खूप वृक्षांची भर पडेल व नक्कीच तापमानात घट होईल, पर्जन्यमान वाढेल. प्रत्येकाने एक प्रतिज्ञा करायची मी झाड तोडणार नाही आणि कोणाला तोडूही देणार नाही.
वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन ही एक लोकचळवळ बनली पाहिजे आणि या वृक्षचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन दरबारी गावपातळीवर वेगवेगळे पुरस्कार ठेवले पाहिजे व जो वार्षिक वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करेल त्याला करामध्ये सवलत दिली पाहिजे, जास्तीत जास्त सौरऊर्जा वापरून जंगल तोड रोखली पाहिजे. जेणेकरून आहे ते जंगल कमी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.
कोरोना काळात प्राणवायू ऑक्सिजनची किंमत किती होती हे जवळपास सर्वांनी अनुभवलंय. एका दिवसाला कमीत कमी दोन हजार रुपये घेत होते. म्हणजे एका वर्षाला आपण एक व्यक्ती सात लाख तीस हजार रुपयांचा निसर्गातून मोफत ऑक्सिजन घेतो. जर मग एवढा पैसा आपला वाचतो तर मग प्रत्येक व्यक्तीने किमान सात हजार रुपये तरी वर्षाला वृक्ष लावण्यासाठी व संवर्धनासाठी खर्च करायला काय हरकत आहे. बघा विचार पटत असेल तर आजपासून तरी सर्वांनी हा उपक्रम सुरू करावा.
पर्यावरणात प्रदूषण होऊ नये म्हणून प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे. आज प्लास्टिकच्या अतिरेकामुळे शहर भकास होत आहे. जिकडे पाहावे तिकडे प्लास्टिकचे गंजच गंज पडलेले आहेत. ते कधीच कुजत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. वृक्षांच्या मोठ्या पानांपासून नैसर्गिक द्रोण पत्रावळ तयार केली पाहिजे की, जी पूर्वीपासून वापरत होते पण चांगलं दिसावं म्हणून प्लास्टिक वापरू लागले ते बंद केलं पाहिजे. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहीम जर शाळेपासून सुरुवात केली तर विद्यार्थ्यांचं वय कमी असते. त्या वयात त्यांच्या मनावर बिंबल गेलं की वृक्षलागवड ही चळवळ निश्चितच यशस्वी होईल आणि पर्यावरणात बदल नक्की होईल, वृक्षमित्र फाउंंडेशनने हे काम हाती घेतले आहे. पाठ्यपुस्तकांत पाठ समाविष्ट करून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व त्यांना समजेल. परिणामी, वृक्षलागवडीत नक्कीच वाढ होईल. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन यानेच पर्यावरणाचा जास्तीत जास्त समतोल राखला जाईल. लोकांना मोकळा श्वास घेता येईल व मानवी जीवन अधिकाधिक सुखकर होईल.

Environmental conservation is the need of the hour.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *