जवळपास एक वर्ष होत आले, मातृतुल्य आदरणीय डॉ.सुनंदाताई गोसावी आपल्यात नाहीत. ….. अर्थात त्या आपल्यात नाहीत ते फक्त शरीराने, स्मृती रूपाने तर त्या, कायम त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या मनात आहेतच, आणि मनातील त्यांचे हे अढळ स्थान, काळ कधीच हिरावून घेवू शकणार नाही. स्त्री शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अलौकिक कार्य, त्या कार्यातून त्यांनी केलेले संस्कार, त्यांचे असामान्य गुण आणि त्यांच्या आठवणी ह्या कायम स्वरूपी मनावर ठसल्या आहेत. ह्या नश्वर जीवनात त्यांचे कार्य मात्र चिरंतन आहे. आज त्यांचा जीवनपट डोळ्यासमोर येतो, प्रत्यक्ष जरी त्या आपल्यात नसल्या तरी, जो आदर्श, त्यांनी त्यांच्या आचार-विचार, व्यवहारातून घालून दिला आहे, त्यातूनच त्या आपल्या सोबत आहेत.
हे माझे मोठे भाग्य की माझ्या अध्यापन कार्याचा शुभारंभ त्यांच्या शुभहस्ते नोकरीची ऑर्डर घेऊन झाला. जणु त्यांचा आशीर्वाद मला लाभला, आणि पुढचा प्रवास सुकर झाला. नोकरीच्या प्रारंभिक काळात, जर आपल्याला कुणाचा भक्कम आधार मिळाला, कुणी सांभाळून घेणारे असले तर, पुढची वाटचाल खूप सुकर होते. मला नोकरीच्या प्रारंभिक काळात असा आधार संस्थापक प्राचार्या डॉ.सौ. सुनंदाताई गोसावी ह्यांच्याकडून मिळाला. खरे तर फक्त मलाच नाही, तर महाविद्यालयातील प्रत्येकाला मिळाला. प्रत्येक शिक्षकाला, कर्मचाऱ्यांना, विद्यार्थीनींना त्यांचा, मायेचा, प्रेमळ मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. त्यामुळेच महाविद्यालयात पारिवारिक वातावरण कायम राहिले, आणि तीच परंपरा विद्यमान प्राचार्या डॉ.सौ. दीप्ती देशपांडे ह्यांनी ही पुढे चालू ठेवली आहे. ह्या कौटुंबिक जिव्हाळ्यामुळेच महाविद्यालय नेहमी प्रगती पथावर राहिले आहे.
आपल्या समाजात आज ही स्त्रियांच्या बाबतीत कायम पारंपारिक दृष्टीकोनातून विचार होतो. उच्च शिक्षित, करियर करणाऱ्या स्त्रीची परीक्षा पण ती पारिवारिक जबाबदाऱ्या कशा पार पाडते, ह्या निकषावर होते. आदरणीय गोसावी मॅडमनी ज्या काळात आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी केली, त्या साठच्या दशकात तर स्त्रीचे उच्च शिक्षण, नोकरी करून स्वत:च्या पायावर उभे रहाणे हे तर शहरी भागात ही लोकांच्या पचनी पडले नव्हते. ‘चूल आणि मूल’ एवढ्या पुरते स्त्रीचे कार्यक्षेत्र मर्यादित होते. लग्नानंतर आपले शिक्षण पूर्ण करून त्यांनी पदवी संपादन केली, प्राचार्यपदाची जबाबदारी घेण्याआधी त्यांनी आधी ‘जिज्ञासा’ महाविद्यालायात मराठी विषयाचे अध्यापन केले.रोज संध्याकाळी महिलांना शिकवण्यासाठी त्या पाटणकर सरांच्या ‘जिज्ञासा’ महाविद्यालायात अध्यापनासाठी जात, तसेच त्या महाविद्यालयाची व्यवस्थापनाची जबाबदारी ही त्यांनी उचलली. ज्ञानदानाच्या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. घरातील जबाबदाऱ्या सांभाळल्या.घरातील ज्येष्ठांची सेवा, तसेच वाढत्या वयातील मुलांवर जागरूकतेने संस्कार करणे ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी लीलया केल्या. तत्कालीन समाजाच्या मनात हा विश्वास निर्माण केला की स्त्री शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराबाहेर पडली, तरी ती घराकडे दुर्लक्ष होऊ देत नाही. उलट तिचे अनुभव क्षेत्र विस्तारल्यामुळे, आत्मविश्वास वाढल्यामुळे ती मुलांवर चांगले संस्कार करू शकते. त्यांना चांगल्या पद्धतीने वाढवू शकते. मॅडमने आपल्या तीन ही मुलांवर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना सुसंस्कृत जबाबदार नागरिक घडविले. मुला -नातवंडांच्या प्रेमळ सहवासात त्यांच्या जीवनाची संध्याकाळ अतिशय समाधानात गेली.
त्या काळात गोसावी मॅडम प्रमाणे ज्या स्त्रियांनी नोकरी करण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकले, त्यांनी समाजाची मानसिकता घडविण्याचे मोठे काम केले. समाजाच्या मनात विश्वास निर्माण केला की, स्त्री ही नोकरी, शिक्षण ह्यासाठी बाहेर पडली तरी कुटुंब व्यवस्था अबाधित ठेवते. ह्या स्त्रियांनी पुढील पीढीतील स्त्रियांसाठी जणु करियर घडविणारी पाऊल वाट तयार केली. आपल्या उदाहरणाने नवीन पीढीतील मुलींना प्रेरणा दिली. आज असे कुठलेही कुठलेही क्षेत्र नाही, जिथे स्त्रियांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला नाही. ह्याचे श्रेय मॅडमना तसेच त्यांच्या पीढीतील अशा स्त्रियांना जाते.
गोसावी मॅडमनी फक्त स्वत: शिक्षण घेतले नाही, तर आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ असणाऱ्या स्त्रियांसाठी त्यांनी महाविद्यालय सुरु केले. फक्त महिलांचे महाविद्यालय असल्यामुळे पालकांना इथे मुलींना पाठवण्यासाठी ही खूप सुरक्षित जागा वाटली. हा विश्वास महविद्यालयाने सार्थ ठरवला. इथे अनेक मुली शिकल्या, आत्मनिर्भर झाल्या. कित्येक विद्यार्थीनींनी विदेशात ही आपली ओळख निर्माण केली आहे. मॅडमनी लावलेल्या हे रोपटे बहरले, मोठे झाले.संत ज्ञानदेवांच्या शब्दात
‘इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’.
ह्या वृक्षाची मधुर फळे पुढच्या कित्येक पिढ्यांना मिळत आहेत.
एस.एम.आर.के. बी.के. ए.के. महिला महाविद्यालयाच्या त्या संस्थापक प्राचार्या. अर्थात ह्या महाविद्यालयाचे रोपटे त्यांनी लावले. निश्चितच एखाद्या कामाचा प्रारंभ करणाऱ्याची जबाबदारी खूप मोठी असते, कारण त्याने आखून दिलेल्या मार्गावर नंतरचे लोक वाटचाल करणार असतात. ही पक्की जाणीव मनात ठेवून स्त्री शिक्षणाचा वसा घेतला. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचे विचारपूर्वक नियोजन केले. त्यांनी गृहविज्ञान, ललित कला ह्यांसारखे थोडे वेगळ्या विद्या शाखा इथे सुरु केल्या. त्या शिकवण्यासाठी उत्तम अध्यापक वर्गाची नेमणूक केली. गृहविज्ञान शाखेविषयी स्वत: नाशिककरांच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ह्या महाविद्यालायाचा भक्कम पाया रचला गेला, व आज इथे कालानुरूप ४० पाठ्यक्रम शिकवले जात आहेत. त्यांचा वारसा प्राचार्या डॉ.सौ. दीप्ती देशपांडे तितक्याच क्षमतेने पुढे नेत आहेत. आज महाविद्यालयाचा विकास-विस्तार झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ते नावारूपाला आले आहे. महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात, वार्षिक गुण गौरव समारंभात मॅडम आवर्जून उपस्थित रहात व त्यांच्या डोळ्यात फक्त समाधान व कौतुक ह्या दोनच भावना दिसत. त्यांचाकडून मिळालेली शाबासकीची थाप लाख मोलाची वाटते.
मॅडमनी आपले उर्वरीत शिक्षण विवाहानंतर पूर्ण केले. मराठी साहित्यात स्नातकोत्तर शिक्षण घेतले. मराठी साहित्यातील संत साहित्याचे थोर अभ्यासक गं.बा.सरदार ह्यांच्या साहित्यावर पीएच.डी. साठी संशोधन केले. गं.बा.सरदार ह्यांचासारख्या विद्वान लेखकाच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास हे आव्हानात्मक काम होते. परंतु मॅडमनी ते केले त्यांच्या साहित्याला साजेसेच. संत साहित्याचा व्यासंग मॅडमना होताच आणि विचारांना अध्यात्मिक बैठक ही होती. त्यामुळे त्यांचे संशोधन ही तितकेच उच्च दर्जाचे झाले. हे सर्व करताना अध्यापन, प्राचार्यपदाची जबाबदारी, कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या ही त्यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळल्या. वेळेचे नियोजन, कामाचे व्यवस्थापन, स्वयंशिस्त ह्या अंगभूत गुणांमुळेच हे शक्य झाले. खरे तर शिस्तप्रिय, कर्तव्य प्रयन लोक जरा कठोर असतात, पण मॅडम ह्या बाबतीत अपवाद होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वाला मायेची झालर होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला हा अनुभव आला आहे. प्रत्येकाची आपलेपणाने चौकशी, चांगल्या कामाचे तोंड भरून कौतुक त्या इतक्या सहजपणे करायच्या की प्रत्येकाला वाटायचे आपण मॅडमच्या जवळचे आहोत.
सुरवातीच्या काळात संस्थेच्या आवारातच निवास स्थान असल्यामुळे संस्थेच्या विविध महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा परिवार शेजारी असल्यामुळे सगळ्यांशी मिळून-मिसळून रहाण्याचे वातावरण आपोआपच झाले होते. सर्वांच्या सुख-दुखात सहभागी होत, वेळप्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभे रहात एका कुटुंबाप्रमाणे वातावरण तयार करण्याचे काम आदरणीय डॉ. सौ.सुनंदाताई गोसावी ह्यांनी केले.
मॅडमबद्दल आणखी एक गोष्ट सांगाविशी वाटते, की एक सहचारिणी म्हणून त्यांचे आगळेपण. सरांचे त्यांचे जवळपास ६० पेक्षा अधिक वर्षांचे सहजीवन होते. हा संसार फक्त आपल्या मुला-बाळांचा संसार नव्हता. तर इथे ‘विद्यार्थी देवो भव’ मानणारा पती होता. हा मोठा संसार सांभाळण्याचे कौशल्य फक्त गोसावी मॅडमचेच. त्यांनी हा मोठा संसार अतिशय नेटकेपणाने सांभाळला. घरात सतत आल्या-गेल्याचा राबता. प्रत्येकाचे आदरातिथ्य अतिशय प्रेमाने करणाऱ्या गोसावी मॅडम. घरी आपले मोठे पद, उच्च शिक्षण ह्या सर्वांची झूल सहजतेने उतरवून त्या वावरत. गोसावी मॅडमच्या व्यक्तिमत्वात अहंकार जरा ही नव्हता. एवढ्या कर्तुत्ववान स्त्रीला इतके साधेपणाने वागताना पहिले की ‘विद्या विनयेन शोभते’ ह्या सुक्तीची आठवण येते.
आपल्या पतीचे मोठेपण त्यांनी जाणले, आणि त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी पूर्ण वेळ देऊ दिला. पारिवारिक जबाबदाऱ्या स्वत: सांभाळल्या. त्यांच्या सहकार्यामुळे सर निश्चिंतपणे आपले काम करू शकले. खऱ्या अर्थाने त्या सहधर्मचारिणी बनल्या. पण त्या बरोबरच त्या स्वत:च्या कार्यक्षेत्रात पण सक्रिय राहिल्या. स्वत:च्या आवडी-निवडी,छंद, कला ह्यात पण रमल्या. शिक्षण क्षेत्रात त्यांनी स्वतःची स्वतंत्र , वेगळी ओळख निर्माण केली. स्त्री शिक्षणाच्या त्यांच्या कार्याचा सन्मान राष्ट्रीय स्तरावरील पुररकाराच्या रुपात झाला. मला त्यांचा जीवनाकडे बघण्याचा आनंददायी दृष्टिकोन खूप भावतो. प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक कामाचा आनंद घेत त्या जगल्या. त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करताना कवी बा.भ.बोरकर ह्यांच्या ओळी स्मरतात
जीवन त्यांना कळलेहो,
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो,
जलापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळाले हो,
चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो.
सौ. रसिका अजय सप्रे
एस.एम.आर.के.बी.के ए.के महिला महाविद्यालय, नाशिक