मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच
मोखाडा: नामदेव ठोंमरे
मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळपाडा येथील आदिवासी ग्रामस्थांना मरणोत्तर प्रेतं प्लास्टिक झाकून भर पावसात दहन करण्याची वेळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे.
कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीत 11 गावपाडे आहेत मात्र 11 गावपाडे मिळून फक्त तीनच स्मशानभूमी आहेत मागील आर्थिक वर्षात शेरेचापाडा, रायपाडा, जांभूळपाडा या तीन ठिकाणी स्मशानभूमीची नितांत आवश्यकता असताना ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ दोनच गावांचे प्रस्ताव ठक्कर बाप्पा योजनेतून सादर केले आहेत. तेही आदिवासी प्रकल्पाकडे धूळ खात पडून आहेत.त्यामूळे आदिवासी बांधवांना प्लॅस्टीकचे आच्छादन करुन भरपावसात उघड्यावरच दहन करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे.
शासन ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळा निधी उपलब्ध करून देत असते.त्याचा वापर ग्रामपंचायतीने जिथे गरज आहे त्या ठिकाणी करायचा असतो परंतु, तसे न करता आपल्याला जास्त फायदा कुठे आणि कोणत्या कामात किती टक्केवारीत होईल याचाच सोयीस्कर विचार ग्रामपंचायत प्रशासन आणि गावाचे कर्ते धर्ते करत असतात.त्यामूळे अत्यंत निकडीचे कामे मागे पडत असतात.कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील ११ गांवे मिळून स्मशानभूमीचे शेड अवघे ३ च असणे हे त्याचेच द्योतक आहे.
प्रस्ताव अडकले लालफितीत
सन २०२४ – २५ मध्ये कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील २ गावांसाठी ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशान भुमी बांधण्यासाठीचे प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय जव्हार यांच्या कडे सादर केले होते.परंतू तेव्हा तसे ते मंजूर झालेले नाहीत.त्यामूळे येथील प्रस्ताव प्रलंबित आहेत.
निखील बोरसे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत कुर्लोद
याबाबत आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून प्रस्ताव सादर केलेले आहेत.मात्र त्या प्रत्येक ठिकाणी प्रस्ताव रखडलेले आहेत.मात्र चालू आर्थिक वर्षात कोणत्याही परिस्थितीत बहूंताश ठिकाणी स्मशानभूमीचे शेड मंजूर करण्याबाबत ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करीन.
मोहन मोडक
लोकनियुक्त सरपंच
ग्रामपंचायत कुर्लोद