माजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यत्रयींवर आधारित नवसमाजनिर्मिती हे महात्मा फुले यांच्या जीवितकार्याचे एकमेव; परंतु सर्वंकष उद्दिष्ट होते. यासाठी सर्व हयात जनसामान्यांच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी महात्मा फुले यांनी अर्पित केली. डॉ. जनार्दन वाघमारे यांनी जोतिरावांना क्रुसेडर म्हटले आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनात मिशन आणि रिबेलियन (बंडखोरी) या दोन्ही गोष्टींचे गुणधर्म एकवटतात ती क्रुसिडर बनते. महात्मा फुले हे मार्टिन ल्यूथर यांच्याप्रमाणे धार्मिक व सामाजिक क्रुसेडर होते. अन्याय आणि विषमतेविरुद्ध त्यांनी लढा पुकारला होता. त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या उदात्त तत्त्वावर त्यांनी सामाजिक पुनर्रचनेचे कार्य हाती घेतले होते. दीडशे वर्षांनंतरसुद्धा महात्मा फुलेंच्या विचारांची गरज आम्हाला का वाटते? याचा विचार करता आजची सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक मूल्य यांना तडा देण्याचे काम सुरू आहे. अशा काळात महात्मा फुले यांचे विचार प्रेरणादायी आणि मार्गदर्शक वाटतात. त्यांच्या 135 व्या स्मृतिदिनानिमित्ताने महात्मा फुले यांचा काळ आज का उगाळायचा, आधुनिक शतकात या महामानवाच्या विचारांची आणि कार्याची गरज का, याविषयी हे मत…
महान पुरुषांचे विचार प्रेरणादायी आणि भावी वाटचालीसाठी प्रेरक असतात. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची 135 वा स्मृतिदिन आपण साजरा करणार आहोत. अनेक युगप्रवर्तक कार्य करून समाजाला अनेक बाबतींत दिशा देऊन हा महामानव 28 नोव्हेंबर 1890 रोजी अनंतात विलीन झाला. त्यांची श्रद्धा होती अशा विश्वनिर्मिकाच्या शोधात ते निघून गेले.
आजच्या टेक्नोसॅव्ही आणि आधुनिक युगात दीडशे वर्षांपूर्वी काहीतरी काम केलेल्या या व्यक्तीला इतकं महत्त्व का द्यायचं? त्यांच्या असण्या-नसण्याची इतकी मीमांसा का करायची? लोक येतात कार्य करतात अन् जातात, तेव्हा महात्मा फुले यांचे विचार, शिकवण आणि कार्याची आजची- उद्याची गरज, महत्त्व यावर इतकी चिंताचिंतन का? म्हणून आजच्या आमच्या पिढीसमोर इतर अनेकानेक अडचणी, आव्हाने असताना फुल्यांचा इतिहासजमा झालेला काळ उगाळायचा? या महामानवाच्या कार्याची मीमांसा करतानाच आधुनिक शतकात या महामानवाच्या विचारांच्या कार्याची गरज काय? याचा जर विचार केला, तर बदलत्या परिस्थितीनुसार मार्गदर्शकाच्या भूमिकेत महात्मा फुले यांचे विचार आजही कार्यप्रवण वाटतात.
भविष्याची दिशा आणि वाटचाल गतकाळात शोधावी लागते. काल काय झालं किंवा काय नाही झालं, हेच उद्या कसं आणि कुठे जायचं आहे, हे निश्चित करतं म्हणून तर इतिहासाचं अध्ययन करायचं असतं. त्या-त्या काळातल्या लढवय्याचं शौर्य, महामानवांचे विचार, सुधारकांचे कार्य आत्मसात करायचं असतं. त्यातच कुठेतरी भविष्याची पाऊलवाट सापडते.
आजची आणि येणारी पिढी कोण महात्मा फुले? कुठले? काय केले त्यांनी, असे प्रश्न विचारू नये किंवा महात्मा फुले यांचे कार्य पुस्तकातल्या पानात बंदिस्त न होता येणार्या पिढ्यांच्या कृतीत दिसावे त्यासाठी त्यांच्या कार्याचा आढावा घेणे वेळोवेळी अत्यावश्यक ठरतं. अनेक रूढी-परंपरांवर त्यांनी हल्ला चढवल्यामुळे अनेकांच्या पोटात आजही शूळ उठतो. महात्मा फुले यांंना चूक किंवा दुर्लक्षित करण्याची प्रवृत्ती आजही काही सनातनी आस्था असणार्या लोकांमध्ये आहे. तेव्हा फुले यांंच्या कार्यावर वेळोवेळी लिखाण करणं क्रमप्राप्त ठरतं. त्यांच्या कार्याचे, विचारांचे पाईक होऊन त्यांच्या कार्याची मशाल पुढच्या पिढीच्या हवाली करताना आपली ही पिढी प्रकाश घेत वाटा शोधू शकेल, हे महत्त्वाचे.
कोण हे महात्मा फुले?
स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, दलितांच्या उत्थानाचे उद्गाते आणि शेतकर्यांसाठी शेतीचं तत्त्वज्ञान मांडणारे पहिले हाडाचे कृषितज्ज्ञ माणूस म्हणजे महात्मा फुले. एकाच वेळी अनेक क्षेत्रांत काम करून प्रस्थापित मूल्यांची, परंपरांची चिकित्सा करत न पटणार्या रूढींना नाकारणारा, सत्याचा अखंड शोध घेणारा, समाजप्रवर्तक, विचारवंत म्हणजे महात्मा फुले. प्रस्थापित मूल्यांना आणि पुरोहितशाहीने निर्माण केलेल्या पोथीनिष्ठ समाजरचनेला सर्वप्रथम सुरुंग लावून उद्ध्वस्त करणारा बुलंद माणूस म्हणजे महात्मा फुले. सत्यमेव जयते हे त्यांचे नित्य व्यवहाराचे ब्रीद होते ते म्हणजे महात्मा फुले. हेच ब्रीद पुढे भारताचे ब्रीदवाक्य झाले.
महात्मा फुले या युगप्रवर्तक महामानवाची समाजाने केवळ प्रतिमा स्वीकारली आणि विचार निव्वळ भाषणापुरते ठेवले. त्यांचे विचार, कार्य वाचण्याची, त्यावर चर्चा करण्याची, त्यांचे विचार आत्मसात करण्याची आजच्या काळाची गरज आहे. जोे समाज आपला इतिहास विसरतो, त्याकडे दुर्लक्ष करतो, तो नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. आज आपण आपल्या या महामानवाला जर केवळ प्रतिमांत बंदिस्त केले तर येणार्या पिढ्यांसाठी ते प्रतिमापुरतेही उरणार नाहीत.
म. फुलेंंचे महत्त्व काय, हे काही लेखकांचं मत असे आहे…
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत म्हणतात, महात्मा फुले सर्व अर्थाने समाजाचे नेते होते.नेतृत्वाच्या अंगी लागणारे सर्व गुण त्यांच्यात होते. सर्वांगीण समाजक्रांतीचे उज्ज्वल ध्येय ते साकार करण्याकरिता अविरत परिश्रम, पडेल तो त्याग आणि कष्ट सोसण्याची तयारी, आघाडीवर राहून सर्व धोक्यांना सर्वप्रथम सामोरे जाण्याची धैर्यशील वृत्ती कृती आणि वाणीमध्ये अजोड मेळ, सत्याची कास, असत्याची- अपप्रवृत्तीची चीड, बाणेदार स्वभाव, शुद्ध चारित्र, स्वतंत्र प्रज्ञा आणि विशाल हृदय या गुणसमुच्चयाने त्यांचे जात्याच देखणे व्यक्तिमत्त्व तेजस्वी झाले होते. त्यांनी हाताळलेल्या सर्व समस्या वंचित, दलित, पीडित बहुजन समाजाच्या
दुःखाची मूलगामी कारणे होती. समाज चौकटीवरच प्रार करून ती मोडून टाकून नवसमाज निर्मितीचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. हजारो वर्षं जे नियम, ज्या श्रद्धा-परंपरा आणि रीतिरिवाज समाजाने धार्मिक भावनेने, तथाकथित परमेश्वरी आदेशानुसार आणि धर्मग्रंथाच्या आधारानुसार जोपासलेा होते त्यांच्यावर आघात करून अज्ञानी समाजाला जागृत करायचे आणि त्यांनी मानेवर घट्ट पकडून ठेवलेले जू फेकून द्यायला त्यांना प्रवृत्त करायचे, हा त्याकाळी समाजद्रोहच होता. स्वतःच्या स्वार्थाकरिता ज्यांनी बहुजनांच्या मानेवर जे जू ठेवले त्यांचा तर कडाडून विरोध होणारच; परंतु ज्यांनी यातून सुटका करायची त्या पीडित समाजाचाही त्याला प्रखर असहकार, मानसिक गुलामगिरी, ही सर्व गुलामगिरीत भीषण कारणही प्रवृत्ती होऊन बसते. ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे म्हणतात, हा माणूस तत्कालीन इंग्रजी शास्त्राप्रमाणे केवळ लिहिणारा, वाचणारा नसून सर्वस्वी नव्या प्रकारच्या जीवघेण्या चळवळीसाठी पायपीट करणारा, नाना तर्हच्या माणसांमध्ये मिसळणारा, दुष्काळी कामे हाती घेणारा, त्या काळातल्या बुरसटलेल्या लोकांकडून एक-दोन आण्यांपासून वर्गण्या गोळा करून त्यांचा चोख हिशोब ठेवून लोकोत्तर व लोकांत अप्रिय अशी स्त्री व शूद्र यांच्या शिक्षणाची कामे करणारा, स्वतः पुस्तके लिहून छापणारा, शूद्रास न्याय मिळवून देण्याकरिता किंवा शूद्रांच्या हुशार मुलांपैकी गरिबांची मुले फुकट शिक्षण घेण्याकरिता अर्ज करून, खेटे घालून कामे यशस्वी करून घेणार्या अशा प्रकारचा हा माणूस असल्यामुळे त्यांच्या लेखनात पंडिती कमकुवतपणा नाही. जोतिबा फुले यांनी पहिल्यांदाच मराठी गद्यात श्रमिकांची व शूद्रांची भाषा उमटवली आहे. खेड्यापाड्यांतील लोकांचे वाक्प्रचार, म्हणी, उच्चारनुसार लेखन इत्यादी गोष्टी त्यांच्या लेखनात आढळतात.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेले पु. ल. देशपांडे म्हणतात, ज्या दुर्दैवी ब्राह्मण विधवांना कधी फूस लावून, कधी जबरदस्तीने त्यांच्या शरीराचा उपभोग घेऊन केरेपोत्यासारखे फेकून दिलेले होते, त्यांच्यावर महात्मा फुले नुसत्याच विलापिका लिहीत बसले नाहीत, तर त्या अभागी स्त्रियांची सावित्रीबाईंकडून बाळंतपणे केली. एवढेच नव्हे, तर अशी बाळंतपणे केली जातील अशी पाटी स्वतःच्या घराबाहेर लावली. त्या माउलीची सुटका करणार्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य अधिक जोखमीचे होते. कारण त्यांच्या या कार्याचा विरोध करून त्यांचे जीवन असह्य करणारे कोणी परकीय राज्यकर्ते नव्हते, तर ते धर्मांध स्वकीय होते.
महात्मा फुलेंनी स्वतःचा हौद अस्पृशांकरिता खुला करून महार, मांग यांच्या मुलांसाठी शाळा स्थापन करून जातिभेदविरोधी मोहिमेला सुरुवात केली. स्वतः व पत्नीला सोबत घेऊन शिक्षकाचे कार्य केले. त्यांच्या अनुयायांनी मात्र नेमकी त्यांच्या याच कृतीला बगल दिली. बोलक्या सुधारकांची भूमिका घेतली. आजही फुले यांंच्या नावाचा जप सोयीनुसार करणार्या मंडळींमध्ये जातीय भेद मानणारेच अनेक आहेत, असे खेदाने म्हणावंसं वाटतं.सामाजिक समतेचं फुले यांचं स्वप्न एव्हाना साकार व्हायला हवं होतं, पण ते साकार होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच दूर जात आहे. बहुजन समाज यावर आत्मचिंतन करताना दिसत नाही.शेवटी बदलत्या काळाच्या ओघात सामाजिक क्रांतीसाठी आजही महात्मा फुलेंचे विचार हे प्रेरणादायी आहेत, याचा विचार आपल्याला करावाच लागेल.