सिडकोत उमेदवारी माघारीच्या दिवशी घडामोडी

प्रभागनिहाय उमेदवारी माघारी
प्रभाग 25 मधून 44 पैकी 22
प्रभाग 26 मधून 46 पैकी 24
प्रभाग 27 मधून 50 पैकी 25
प्रभाग 28 मधून 31 पैकी 14
प्रभाग 29 मधून 46 पैकी 22
प्रभाग 31 मधून 55 पैकी 28

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या हद्दीत येणार्‍या प्रभाग क्रमांक 25, 26, 27, 28, 29 आणि 31 या सहा प्रभागांतून 24 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सहा प्रभागांत 136 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. शेवटच्या दिवशी एकूण 272 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
उमेदवारी माघारीचा अखेरचा दिवस असल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सिडको विभागीय कार्यालय परिसरात उमेदवार, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ होती. माघारीसाठी दिलेल्या वेळेचा शेवट जवळ येताच विविध राजकीय हालचाली घडत असल्याचे चित्र दिसले. यादरम्यान भाजपचे दीपक बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक 25 मधील आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. मात्र, प्रभाग क्रमांक 29 मधून त्यांनी उमेदवारी कायम ठेवली असून, ते भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. या घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानुसार पक्षनियमांचे पालन करत माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांनीही प्रभाग क्रमांक 25 मधून आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांचा मार्ग मोकळा झाला असून, त्या भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या प्रभागातून माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचा अर्ज कायम असून, प्रकाश अमृतकर भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत. साधना मटाले या भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
प्रभाग क्रमांक 29 मध्ये दीपक बडगुजर भाजपकडून निवडणुकीत असून, माजी नगरसेवक मुकेश शहाणे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. या प्रभागात डॉ. योगिता हिरे, भूषण राणे, दीपक बडगुजर आणि छाया देवांग भाजपकडून उमेदवार आहेत.
दरम्यान, सिडको विभागीय कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमल्याने परिसरात गजबजलेले वातावरण होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माघार घेणार्‍या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, वंदना बिरारी, अमोल जाधव, संजय नवले, मनोहर बोराडे, देवानंद बिरारी, अपर्णा शिंदे, राम पाटील, सुधाकर जाधव, वंदना पाटील, मंदाकिनी जाधव, नितीन माळी, अंकुश वराडे, संदेश एकमोडे, प्रियंका बडगुजर, आरती झनकर, त्र्यंबक कोंबडे, रवींद्र गामणे, अनिता कोंबडे, राणी गवळी, वैशाली चोरडिया, मनीषा जाधव, पुष्पा बोराडे यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 31 मध्ये भाजपमध्ये नाराजीचे चित्र दिसून आले आहे. महिला सर्वसाधारण गटातून सोनाली एकनाथ नवले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाथर्डी मंडल अध्यक्ष जितेंद्र चोरडिया आणि भाजपचे जुने कार्यकर्ते संजय गायकवाड यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत.

Events on the day of withdrawal of candidature in CIDCO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *