इगतपुरीतील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम बंदोबस्तात सील

मतमोजणी लांबल्याने इगतपुरीत उमेदवारांनी घेतली धास्ती

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शहरातील नागरिकांनी मतदान केले. त्याची मतमोजणी दुसर्‍याच दिवशी होणार होती, पण ती पुढे ढकलल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता ही मतमोजणी दि.21 डिसेंबरला होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी धास्ती घेतली आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह वीस नगरसेवकपदाचे उमेदवार निवडून येतील, असा दावा भाजपकडून संजय इंदुलकर (माजी नगराध्यक्ष) यांनी केला, तर शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह 21 जागा आम्हीच जिंकू, असा दावा राष्ट्रवादी नेते तथा माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण व शिवसेनेकडून युवानेते संजय खातळे यांनी केला आहे. शिवसेना उबाठा गटाकडूनही पाच ते सहा नगरसेवकपदाचे उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा नवल सोनार यांनी केला आहे. गेल्या 20 वर्षांपासून नगरपरिषद निवडणुकीची मतदानाची टक्केवारी 68 ते 69 इतकीच होत आहे. अनेक मतदारांनी विकासकामांच्या मुद्यासह सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणी, शौचालय, रस्ते, पार्किंग, मार्केट आदी सुविधाच पुरवल्या जात नाहीत. नगरपरिषदेची हद्दवाढ झालेल्या आदिवासी बांधवांना नगरपरिषदेकडून कोणतीही सुविधा उपलब्ध झाली नसल्याने मतदान करणे अनेकांनी टाळल्याचे ज्येष्ठांंकडून सांगण्यात आले.
यंदा मतदारांची संख्या 25 हजार 77 होती. पुरुष 12 हजार 511, तर महिला मतदार 12 हजार 566 होत्या. त्यामुळे गेल्या साडेसात वर्षांच्या कालावधीत फक्त 609 नवीन मतदार वाढले. यंदाही 68.68 टक्केच मतदान झाल्याने 0.15 इतकेच मतदान वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांनी पक्षांतर केल्याने अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केले. मात्र, मतदान संपताच शहरातील वातावरण शांत झाल्याचे दिसले.
यंदा ओबीसी महिला राखीव आरक्षण पडल्याने चार महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, दुरंगीच लढत झाल्याचे बोलले जाते. मतदान झालेल्या सर्व ईव्हीएम मशिन नाशिक-मुंबई महामार्गालगत आयटीआय केंद्रात ठेवण्यात आल्या आहेत. त्यांची देखरेख 24 तास ठेवली असून, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पाच पोलीस कर्मचारी, एसआरपी पोलीस कर्मचारी आठ व प्रशासकीय कर्मचारी प्रत्येकी आठ तासांसाठी एक कर्मचारी ठेवला आहे. तसेच सीसीटीव्हीचे तेरा कॅमेरे बसविले आहेत. स्ट्राँगरूमच्या मुख्य दरवाजावर एक बंदुकधारी पोलीस कर्मचारी व एक अग्निशमन दलाचे वाहन ठेवण्यात आले आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचे प्रतिनिधी येथे आल्यास त्यांची रजिस्ट्ररवर नाव, ओळखपत्र तपासून सही घेऊन त्यांना बाहेरून स्ट्राँगरूम व हॉल दाखविण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित बारवकर, इगतपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *