अग्रलेख

अपेक्षित निवड

गेल्या वर्षी आपला रीतसरपणे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याऐवजी भाजपाला कार्यकारी अध्यक्ष निवडावा लागला. गेल्या वर्षी जे. पी. नड्डा यांना मुदतवाढ देण्यात आल्याने ते सहा वर्षे अध्यक्ष राहिले. गेल्या महिन्यात (डिसेंबर) नवीन नबीन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पक्षाच्या राष्ट्रीय संसदीय मंडळाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. अध्यक्ष होण्यापूर्वी नड्डा यांनाही कार्यकारी किंवा हंगामी अध्यक्ष करण्यात आले होते. नवीन नबीन यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले तेव्हा त्यांचीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड पक्की झाली होती. नबीन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खास मर्जीतील आहेत. त्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात मोदी-शहा यांची महत्त्वाची भूमिका होती. आताही त्यांनीच नबीन यांना पसंती दिली. सन 1980 भाजपाची स्थापना झाली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे पक्षात मोठे वजन होते. पक्षाचा अध्यक्ष कोणीही झाले, तरी ते वाजपेयी-अडवाणी यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घ्यायचे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाची सर्व सूत्रे मोदी-शहा यांच्या हातात गेली. अमित शहा हेच 2014 साली अध्यक्ष झाले. ते केंद्रात गृहमंत्री झाले तेव्हा नड्डा यांना अध्यक्ष करण्यात आले, पण त्याआधी त्यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले होते. हा निर्णय अर्थातच मोदी-शहा यांचा होता. नबीन यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याचा निर्णयही त्यांचाच. त्यावेळी नबीन यांचे अभिनंदन करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अग्रभागी होते. नबीन यांचा उत्साह आणि समर्पण येणार्‍या काळात आपल्या पक्षाला बळकटी देईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला होता. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. नबीन यांच्या रूपाने बिहारला प्रथमच भाजपाचे अध्यक्षपद मिळाले आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश (आताचे तेेलंगणा राज्य मिळून) या राज्यांतील नेत्यांना अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळालेली आहे. सन 1980 साली अटलबिहारी वाजपेयी संस्थापक अध्यक्ष झाले, तर 1986 मध्ये अडवाणी अध्यक्ष झाले होते. वाजपेयी (1980-1986), अडवाणी (1986-1991) व (1993-1998, 2004-2005), डॉ. मुरली मनोहर जोशी (1991-1993), कुशाभाऊ ठाकरे (1998-2000), राजनाथ सिंह (2005-2009) व (2013-2014), नितीन गडकरी (2009-2013), अमित शहा (2014-2020), जे. पी. नड्डा (2020-2026), नितीन नबीन (2026 पासून) अध्यक्ष व त्यांच्या कार्यकाळावर नजर टाकल्यास, अडवाणी यांना सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यांच्याच काळात पक्षाचा मोठा विस्तार झाला. अडवाणींच्या नेतृत्वाखालील अयोध्येत राममंदिर उभारण्याची चळवळ उभी राहिली. या चळवळीमुळेच भाजपाने राष्ट्रीय राजकारणात मुसंडी मारली. सन 1996, 1998 व 1999 च्या लोकसभा निवडणुकांनंतर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होऊ शकले. इतकेच नव्हे, तर 1984 साली लोकसभेत दोन जागा असलेल्या भाजपाने मोठी मजल मारली. सन 2029 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी नबीन यांच्यावर असली, तरी कमान मोदी-शहा यांच्याच हातात असेल. नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात अध्यक्ष म्हणून नबीन यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. त्यांना औपचारिकरीत्या या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, प्रदेश भाजप अध्यक्ष आणि संघटनमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. नबीन यांना गृह मंत्रालयाने झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान केली. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी नबीन यांनी सकाळी मंदिरे आणि गुरुद्वारांमध्ये प्रार्थना केली आणि आशीर्वाद घेतला, ही लक्षणीय बाब आहे. नबीन भाजपाच्या इतिहासातील सर्वांत तरुण अध्यक्ष आहेत. पक्षात त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले अनेक वरिष्ठ मंत्री आणि सदस्य आहेत. या सर्वांना शिष्टाचार पाळावा लागणार आहे. नबीन हे पक्षात माझे बॉस असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्रोटोकॉलनुसार मोदींचे अगदी बरोबर आहे; परंतु मोदी-शहा यांनी आपल्याला अध्यक्ष केल्याची जाणीव नबीन यांना आहेच. तशी ती ठेवतील आणि त्यांच्याच सल्ल्याने काम करतील. नितीन नबीन यांचा जन्म 1980 मध्ये पाटणा येथे झाला. सन 2005 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली आणि नबीन आमदार झाले. त्यांनी पाटणा पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. 2016 मध्ये त्यांना भाजपा युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. ते संघटनेत सक्रियपणे सहभागी राहिले. ते पाच वेळा आमदार झाले आणि त्यांनी तीन वेळा मंत्रिपद भूषवले. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रभावी कामगिरीनंतर त्यांना भाजपचे कार्यवाह अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. पक्षाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्यासमोर भाजपशासित राज्यांमध्ये सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. दक्षिण भारतात ताकद वाढविण्याचे आव्हान आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि आसाममध्ये याच वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. आसाममध्ये तिसर्‍यांदा आणि पुद्दुचेरीमध्ये दुसर्‍यांदा भाजपचे सरकार स्थापन करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे. कर्नाटकमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह संपवणे हेदेखील नितीन नबीन यांच्यासाठी एक आव्हान असेल. शिवाय, त्यांना इतर राज्यांमधील स्थानिक नेत्यांमधील मतभेद दूर करून समन्वय सुनिश्चित करावा लागेल. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या राज्यांकडे विशेष लक्ष त्यांना द्यावे लागेल. अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अनेक राज्यांत सत्ता मिळवली आणि केंद्रात सलग दुसर्‍यांदा सरकार स्थापन केले, तर जे. पी. नड्डा यांच्या काळात पंचायत ते संसद स्तरापर्यंत पक्ष अधिक मजबूत झाला, असे मोदी यांनी अभिनंदन भाषणात म्हटले. नितीन नबीन यांच्यात तरुणाईची ऊर्जा आणि अनुभव यांचा संगम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी नबीन यांना झपाट्याने काम करावे लागेल. त्यांच्या मदतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह बडे नेते आहेतच. त्यामुळे नबीन आक्रमक पवित्रा घेतीलच. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच्या भाषणात नबीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. आम्ही सामान्य कार्यकर्ते म्हणून नेहमीच लांबून पाहत आलो आहोत की, पंतप्रधान मोदी देशाच्या सेवेसाठी सातत्याने कसे कार्यरत आहेत, असे ते म्हणाले. अध्यक्षांनी मोदींचे कौतुक करणे स्वाभाविक आहे. भाजपातील लहान-मोठे नेते मोदींचे कौतुक करतात. कारण देशात भाजपची सत्ता आहे ती मोदींमुळेच. बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा नबीन निवडून आले. राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. पक्षात विविध पदेही त्यांनी भूषवली. दिनांक 23 मे 1980 रोजी नितीन नबीन यांचा जन्म झाला. याच वर्षी भाजपची स्थापना करण्यात आली होती. झारखंडची राजधानी रांचीचे ते रहिवासी आहेत. त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा पक्षाचे भाजप आमदार होते. सन 2005 मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर नितीन नबीन राजकारणात सक्रिय झाले. 2006 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी घेऊन ते प्रथमच आमदार झाले. 2010, 2015, 2020 व 2025 याप्रमाणे ते चार वेळा बांकीपूरचे आमदार झाले. रस्ते वाहतूक, नगरविकास, गृहनिर्माण, विधी व न्याय खात्याचे मंत्री राहिले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिक्कीमचे प्रभारी, छत्तीसगडचे सहप्रभारी म्हणून त्यांनी काम केले आहे. डिसेंबर 2025 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. ते आता सर्वाधिकार असलेले अध्यक्ष झाले आहेत.

expected choice

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

4 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

4 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

5 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

5 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

5 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

5 hours ago