मंत्री दादा भुसेंनी स्वीकारली जबाबदारी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून येण्याची अपेक्षा होती. परंतु अपेक्षित यश मिळाले नसले, तरी मतदारांनी दिलेला निकाल आम्ही स्वीकारतो. तसेच याच्या-त्याच्याकडे बोट दाखवण्यातला मी नाही. आम्ही कुठे चुकलो. कुठे चुका झाल्यात यावर प्रभागानुसार अभ्यास करू, असे म्हणत शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी महापालिका निवडणुकीच्या पराभवावर भाष्य केले.
शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचे आयोजन पक्ष कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. भुसेे म्हणाले, की नाशिक मनपात जास्त नगरसेवक निवडून येतील, अशी अपेक्षा होती. परंतु जनता जनार्दनाने दिलेला आशीर्वाद आम्हाला स्वीकारावा लागतो. मोठ्या प्रमाणात आमचे उमेदवार निवडून येतील अशी खात्री होती. अपेेक्षित यश न मिळाल्याने याच्या त्याच्याकडे बोट दाखवत नाही. मी स्वीकारणारा कार्यकर्ता आहे. आमच्याकडून काय चुका झाल्या त्या नक्कीच सुधारू आणि त्यावर अभ्यास करणार असल्याचे म्हटले. मनपामध्ये विरोधी बाकांवर बसायचे का? याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यांना जे योग्य वाटेल, त्यानुसारच नियोजन केले जाईल. असे भुसे यांनी म्हटले.
मालेगावचा कौल हा शिंवसेनेला
मालेगावबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील. पक्षाचे वीसपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. वरिष्ठांच्या कानावर ही बाब घालून योग्य निर्णय घेतला जाईल. शिवसेनेवर जनतेचा शिक्कामोर्तब झाल्याने स्पष्ट कौल दिला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही शिवसेना शिंदे गटालाच जनतेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
लाडकी बहीण योजनेबाबत दिलासा
लाडकी बहीण योजनेसाठी पूर्वीचेच निकष असून, पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. बर्यापैकी लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्वीकृत नगरसेवकांबाबत कोणताही घोडेबाजार होणार नाही. स्वीकृत नगरसेवकांबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत बोलताना मंत्री भुसे म्हणाले, की मुंबईत विजयी उमेदवारांची आकडेवारी समोर आहे. परिस्थिती पाहून आणि संवाद साधून जे योग्य वाटेल, तो निर्णय शिंदे घेतील.
Expected success not achieved in Nashik, public vote accepted