बाह्यरिंगसाठी तब्बल 10 हजार कोटींचा खर्च



नाशिक : प्रतिनिधी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वभूमीवर नाशिकच्या चोहोबाजूने तब्बल 60 किमी. चा बाह्यरिंगरोडचे काम होणार आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत बाह्यरिंगरोड बाबत
सकारत्मक भूमिका घेत लवकरात लवकर हा बाह्यरिंग करणार असल्याचे म्हटले आहे. प्रारंभी या बाह्यरिंग रोडचा खर्च पालिका करणार असल्याची चर्चा होती. मात्र पालिकेची आर्थिक स्थिती आणि एवढया मोठया बाह्यरिंगरोडचा खर्च उचलणे शक्य नसल्याने एमएसआरडी या बाह्यरिंगरोचे काम करणार आहे. यासाठी तब्बल 10 ह्जार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027-2028 या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सिंहस्थात भूसंपादनासह साठ किलोमीटरच्या बाह्य रिंगरोड प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या आराखडयात बांधकाम विभागाने पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा. मिळकत विभागाने आवश्यक भूसंपादन, वैद्यकीय व आरोग्य विभागाने सेवा करण्याच्या सूचना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. तर यानुसारच नाशिक शहराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहराच्या पलीकडे जाण्यासाठी बाह्य रिंगरोडचे नियोजन करण्यात आले आहे. हा बाह्य रिंगरोड साधारण 60 किमी लांबीचा होणार असून तयार केलेल्या आराखड्यात रस्त्याची रुंदी काही ठिकाणी 36 एवढी आहे. तर काही ठिकाणी 60 मीटर आहे. मात्र हा संपूर्ण रिंगरोड 60 मीटर एवढाच असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. या रिंगरोडमुळे बाहेरून येणारी वाहने शहरात येऊन गर्दी करण्यापेक्षा बाहेरच्या मार्गाने जाणार आहेत. त्यामुळे या रिंगरोडमुळे भविष्यात शहरातील वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. विशेषत: कुंभमेळयात होणाऱ्या गर्दीचा भार शहरात पडणार नाही. काही दिवसांपूर्वी या रिंगरोडसाठी केल्या जाणाऱ्या भुसंपदनासाठी वाढीव टीडीआर मिळावा अशी मागणी शासनाकडे प्रस्ताव पाठवून करण्यात आली आहे. अद्याप यासंदर्भात शासनाकडून त्यावर निर्णय झालेला नसून लवकरच टीडीआरचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.


असा असणार बाह्य रिंगरोड


नांदूर नाका ते जत्रा हॉटेल लिंक रोड
सातपूर-अंबड लिंक रोड
गंगापूर- सातपूर लिंक रोड
बिटको विहीतगाव-देवळाली रोड

वाहनधारकांना भरावा लागणार टोल
बाह्यरिंगरोडसाठी सुमारे दहा हजार कोटींचा ख्रर्च येणार असल्याची शक्यता आहे. तसेच या रिंगरोडचे काम उच्चस्तरीय गुणवत्तापूर्वक असणार आहे. त्यामुळे या रिंगरोडवर वाहनधारकांकडून टोल आकारला जाणार आहे. त्यामुळे शहर व जिल्हासह बाहेरील र्राज्यातील वाहनांना टोलचा भार सहन करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *