नाशिक-पुणे रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती; तरीही सिन्नरची पत्र मोहीम सुरूच
सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे जलदगती रेल्वे मार्गाच्या आरेखनात बदल करण्याच्या हालचालींमुळे सिन्नरमध्ये संतापाची लाट उसळली असून, मूळ मार्गावर ठाम राहण्याचा निर्धार स्थानिकांनी पुन्हा व्यक्त केला आहे. राज्य सरकारने तज्ज्ञ समिती जाहीर केली असली तरी, समिती नव्हे तर ठोस निर्णय हवा, अशी भूमिका घेत सिन्नरमधील रेल्वे कृती समितीने 20 ते 25 हजार पत्रे थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्याची मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
विधान परिषदेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जीएमआरटी’ प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष तज्ज्ञ समिती नेमली जाईल, असे जाहीर केले. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय नियमांशी संबंधित असल्याने थेट बदल शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समिती तीन महिन्यांत अहवाल सादर करेल व मर्यादित बदलांद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल, असे त्यांनी नमूद केले.
मात्र, सिन्नर रेल्वे कृती समितीने केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यास नकार दिला आहे. प्रशासनावर जनभावनेचा दबाव कायम राहावा, यासाठी पत्र मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्धार कृती समितीचे पदाधिकारी बबन वाजे यांनी व्यक्त केला.
मूळ आरेखनासाठी ठाम भूमिका
नाशिक-सिन्नर-अकोले-संगमनेर-नारायणगाव-राजगुरूनगर-चाकण या मूळ आरेखनासाठी संगमनेर व अकोलेनंतर सिन्नरमध्येही पत्र मोहिमेला वेग आला आहे. आमदार तांबे यांच्या आवाहनानंतर सुरू झालेली ही चळवळ आता व्यापक जनआंदोलनाचे रूप धारण करत असून, 25 हजार पत्रांचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आंदोलनाची धार कायम ठेवण्याचा पवित्रा कृती समितीने घेतला आहे.
पत्र मोहिमेला वेग
सिन्नर तालुक्यातून 20 ते 25 हजार पत्रे पाठविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पत्रे पाठवली जाणार आहेत. सिमा या औद्योगिक संघटनेने 1000 पत्रे खरेदी करून सहभाग नोंदवला आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध औद्योगिक संघटनांनाही या मोहिमेत सहभागी केले जात आहे.
Expert committee for Nashik-Pune railway; Sinnar’s letter campaign continues