लासलगाव भाभा अणुसंशोधन केंद्रातून दीड महिन्यात ६०० टन आंब्याची निर्यात

लासलगाव भाभा अणुसंशोधन केंद्रातून दीड महिन्यात ६०० टन आंब्याची निर्यात

सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल

लासलगाव:-समीर पठाण

एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या आंब्याच्या हंगामाची भारतीयांबरोबरच विदेशी नागरिकांनाही प्रतीक्षा असते.दरवर्षी भारतातून विदेशात ५० हजार टनांपर्यंत आंब्याची निर्यात होते त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे.यंदा लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून अवघ्या दीड महिन्यात ६०० टन आंब्याची निर्यात झाली आहे.यातून सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून ३१ जूनपर्यंत एक हजार टनांपर्यंत निर्यात होण्याचा अंदाज आहे.दुसरीकडे यंदाही अवकाळीचा फटका बसल्याने त्याचा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हवाई आणि समुद्रामार्गे केल्या जाणाऱ्या निर्यातीमध्ये महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील आंबा प्रामुख्याने अमेरिका,आॅस्ट्रेलिया,मलेशिया,दक्षिण आफ्रिका, न्यूयॉर्क,कॅलिफोर्निया,सॅन फ्रान्सिसको,लॉस एंजिल्स, शिकागो,न्यू जर्सी,ह्युस्टन आदी ठिकाणी पाठविला जातो.गतवर्षी एकट्या अमेरिकेत लासलगाव येथील कृषकमधून सुमारे एक हजार टन आंब्याची निर्यात झाली होती.यंदा अवकाळीचा फटका बसल्याने त्याचा निर्यातीवर परिणाम होताना दिसून येत आहे.गेल्या १ एप्रिल रोजी यंदाच्या निर्यात हंगामाला प्रारंभ करण्यात आला.महाराष्ट्रातील मराठवाडा,रत्नागिरी,देवगड येथील आंब्यासह कर्नाटक, केरळ,आंध्र प्रदेश,तेलंगणा,गुजरात या राज्यांतील आंबा लासलगाव येथून निर्यात केला जात आहे.निर्यातीची प्रक्रिया ३१ जूनपर्यंत चालणार आहे.

३१ ऑक्टोबर २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्रात आंब्यांची साठवणूक केली जाते.याठिकाणी गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरणचा आंब्यावर मारा केला जात असल्याने आंबा पिकण्याची क्रिया लांबते,शिवाय कोयीतील कीड नष्ट होते.उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होत असल्याने महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील आंबा येथून निर्यात केला जातो.

 

या जातीच्या आंब्यांची होते निर्यात

हापूस,अल्फान्सो,केशर,बदाम,राजापूर,मल्लिका,हिमायत,दशहरा,वेगनपल्ली,लंगडा,चौसा

या देशांमध्ये मागणी

अमेरिका,ऑस्ट्रेलिया,मलेशिया,दक्षिण आफ्रिका,न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया,सॅन फ्रान्सिसको,लॉस एंजिल्स,शिकगो,न्यू जर्सी,ह्युस्टन आदी.

न्यूझीलंडच्या बाजारपेठेत आंबा

दक्षिण कोरिया,आणि जपानच्या निर्यातीला परवानगी मिळाली असून न्यूझीलंड बाजारपेठेतही भारतातील आंबा जाण्यास सुरुवात झाली आहे.ऐन कोरोना काळातही जपान आणि दक्षिण कोरियात प्रत्येकी ५० टन असे शंभर टन आणि युरोपियन व अन्य देशांसाठी २०० टन आंब्यांची निर्यात करण्यात आली होती.

लासलगाव कृषकमधून झालेली आंबा निर्यात

वर्ष – निर्यात (टन)

२००७ – १५७
२००८ – २७५
२००९ – १२२
२०१० – ९६
२०११ – ८५
२०१२ – २१०
२०१३ – २७५
२०१४ – ३२८
२०१५ – ३२८
२०१६ – ५६०
२०१७ – ६००
२०१८ – ५८०
२०१९ – ६८५
२०२० – कोरोना
२०२१ – कोरोना
२०२२ – ३६०
२०२३ – १०००
२०२४ – ६०० (१४ मे २०२४)

प्रतिक्रिया

अवकाळी पावसाचा लगेचच परिणाम दिसून येणार नाही. आणखी पंधरा दिवस आंब्याची निर्यात सुरळीत सुरू राहील.त्यानंतर मात्र प्रमाण कमी होईल.३१ जूनपर्यंत निर्यात प्रक्रिया सुरू राहणार असून यंदा एक हजार टन निर्यातीचा आकडा पार केला जाण्याची शक्यता आहे.

संजय आहेर,कृषक अधिकारी,लासलगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *