यंदा रेकॉर्ड ब्रेक निर्यातीची शक्यता
नाशिक : प्रतिनिधी
जिल्हयातील द्राक्ष शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करुन द्राक्षाचे उत्पादन घेता येते. याकरिता त्यांना लाखोंचा खर्च येतो. नैसर्गिक आपत्त्तीचा प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना फटका बसतो. त्यातच कोवीडमुळे मागील दोन वर्ष द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण होती, दरम्यान यंदा नववर्षाची सुरुवात चांगली झाली असून चालू वर्षात नोव्हेंबर पासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यत 1 हजार 970 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात विदेशात झाली आहे. पुढच्या काही दिवसात निर्यातीचा आकडा लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. मागील पाच वर्षात एकट्या नाशिक जिल्हायातून 6 लाख 44 हजार मेट्रिक टन द्राक्षाची युरोप व इतर देशात निर्यात करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात 62 हजार 982 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जाते. यामध्ये निफाड, दिंडोरी, नाशिक आणि निफाड हे तालुके द्राक्ष घेण्यात अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे राज्यातील 91 टक्के द्राक्ष निर्यात ही एकट्या नाशिक जिल्ह्यातून होत असून यंदा तर नवववर्षाच्या सुरुवातीलाच एकट्या युरोप खंडात नाशिक जिल्ह्यातून 466 मेट्रिक टन द्राक्ष जाऊन पोहचली आहे. युरोप खंडात नेदरलँड, जर्मनी, बेल्जीयम, युके आणि डेन्मार्क हे द्राक्षांची आयात करणारे मुख्य देश आहेत. तर युरोप वगळता ईतर खंडांचा विचार केला तर रशिया, युएई, कॅनडा, तर्की आणि चीन या देशातून द्राक्षांना मोठी मागणी होत असते.या देशात चालू वर्षात 1 हजार 470 मेट्रिक टन द्राक्षे पोचली आहेत. द्राक्ष निर्याती करिता रजिस्ट्रेशनची मुदत मार्च पर्यंत वाढवली असल्यानेही निर्यात वाढेल, तसेच मार्गदर्शन करण्यासाठी निर्यात कक्षही स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील हवामान द्राक्षबागांसाठी अनुकूल असून या वर्षी निर्यातीचे देखिल रेकॉर्ड ब्रेक होईल आणि सव्वा लाखाहून अधिक मेट्रिक टन द्राक्ष सातासमुद्रापार जाऊन पोहोचतील अशी अपेक्षा आहे. निसर्गाने साथ द्यावी आणि कोरोनासारखे कोणते नवे संकट पुन्हा ओढावू नये अशीच प्रार्थना शेतकरी करत आहेत. मागील दोन वर्षे आधी कोरोना आणि त्यानंतर रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका द्राक्ष निर्यातीला बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. मात्र यंदा वर्षाची सुरुवात चांगली झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 15 फेब्रुवारी नंतर निर्यातीचा खरा काळ सुरु होणार असून द्राक्षाला योग्य दर मिळावा, यात घसरण होऊ नये अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान मागील काही वर्षाचा आढावा घेतला असता 2018 पासून 2022 पर्यंत चढउतार द्राक्ष निर्यातीत पाहायला मिळाले.
चौकट…
पाच वर्षात विदेशात द्राक्षाची झालेली निर्यात
वर्ष : युरोपीयन देश : नॉन युरोप देश : एकुण निर्यात
2018-2019 : 80 हजार 619 : 35 हजार 854 : 1 लाख 16 हजार 473 मे.ट
2018-2019 1 लाख 11 ह्जार 536 : 3 ह्जार 987 मे.ट : 1 लाख 51 हजार 408 मे.ट
2019-2020 81 हजार 417 34 हजार 121 मे.ट : 1 लाख 15 हजार 538 मे.ट
2020-2021 95 हजार 391 36 हजार 482 मे.ट : 1 लाख 31 हजार 873 मे.ट
2021-2022 94 हजार 43 25 हजार 335 मे.ट : 1 लाख 19 हजार 378 मे.ट
2022-2023 (नोव्हें ते आजपर्यत) 466 : 1 हजार 470 मे.ट ; 1 हजार 970 मे.ट