फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला

अन दोन कोटी गमावून बसला

 

शहापूर :  साजिद शेख

एका तरुणीच्या मोहजालात अडकून एका नामांकित महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाने जवळपास २ कोटी रुपये गमावले आहेत. फेसबुकवर मैत्री करून या तरुणीने मधाळ बोलुन प्राध्यापकाला क्रिप्टो करंसीत (आभासी चलन) पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि १ कोटी ९० लाख रुपये घेऊन पोबारा केला. पश्चिम सायबर विभागात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६२ वर्षीय तक्रारदार हे मुंबईच्या एका नामांकित महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना फेसबुकवर आयशा नावाच्या तरुणीची रिक्वेस्ट आली. तक्रारदाराने ती स्विकारली. त्यानंतर आयशाने त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि ते दोघे व्हॉटसअपवर बोलू लागले. ती गुरूग्राम येथे राहणारी होती. तिने ग्लोबल आर्ट कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. आयशाने तक्रारदार प्राध्यापाकाशी मधाळ बोलून विश्वास संपादन केला. नंतर त्यांना क्रिप्टो करंसी (आभासी चलन) बद्दल माहिती दिली. कशा प्रकारे गुंतवणूक केल्यास फायदा होतो याच्या काही टिप्स दिल्या.तक्रारदार प्राध्यापकाने तिने दिलेल्या टिप्स पडताळून पाहिल्या. ती माहिती खरी निघाली आणि त्या टिप्स परिणामकारक असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचा आयशावर पुर्ण विश्वास बसला. मात्र आयशा आणि तिच्या साथीदारांनी तो एकप्रकारचा सापळा लावला होता. तिने बिटकॉईन मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार आयशाने त्यांचे आधार कार्ड, ईमेल आयडी घेऊन बिनान्स खाते सुरू केले आणि वेगवेगळ्या बॅंक खात्यात काही रक्कम भरण्यास सांगितली. त्यानुसार त्यांनी पैसे भरण्यास सुरवात केली. मात्र काही दिवसांनी आयशाने संपर्क तोडून टाकला. त्यामुळे तक्रारदार अस्वस्थ झाले होते.तक्रारदार प्राध्यापक सायबर भामट्यांनी लावलेल्या पहिल्या सापळ्यात अलगद सापडले होते. त्यानंतर मग पुढचा सापळा लावण्यात आला. कोयल नावाच्या दुसर्या तरूणीने फोन केला. त्यांनी गुंतवलेले पैसे ४-५ दिवसात मिळवून देते असे सांगितले. त्यानंतर त्यांना प्रशांत पाटील नामक इसमाचा फोन आला. त्याने पहिल्या टप्प्यात साडेसात लाख मिळतील मात्र त्यासाठी ४२ हजार ७३५ रुपेय भरावे लागतील असे सांगितले. त्यांतर मग तक्रारदार प्राध्यपकाला वेगवेगळ्या कारणाने पैसे भरायला लावण्यात आले. क्रिप्टो करंसी, बिट कॉईन मध्ये गुंतवणूक नंतर ते पैसे काढण्यासाठी पुन्हा पैसे भरत गेले. त्यांनी एकूण १ कोटी ९३ लाख रुपये भरले होते. त्यांनर मात्र त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.सायबर पश्चिम विभागाने या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *