नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला प्रकर्षाने स्पर्शून गेले. त्या अनुषंगाने श्रद्धा, तिचे बदलते प्रवाह आणि त्यामागील मानवी मनोवृत्ती याबाबत काही विचार मांडावेसे वाटले. ही मते कुणावर लादण्याचा हेतू नसून, श्रद्धेच्या विषयाकडे समजूतदार आणि विवेकपूर्ण दृष्टीने पाहण्याचा एक प्रयत्न म्हणून त्याकडे पाहावे.
आज राजस्थानातील खाटू श्यामजीला जाणार्या भाविकांची वाढती संख्या पाहिली, की सहज लक्षात येते की श्रद्धेचे प्रवाह काळानुसार बदलत राहतात. दर्शनासाठी जाताना अत्तर अर्पण करणे, तेच अत्तर पुन्हा प्रसाद म्हणून घरी आणणे आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते, असा विश्वास ठेवणे, ही दृश्ये आज अनेक ठिकाणी दिसतात. नव्वदच्या दशकात मूल होत नाही म्हणून गुजरातमधील भावनगरला नवविवाहितांची मोठी गर्दी होत असायची. पुढच्या काही दशकात वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या दर्शनाच्या निमित्ताने ‘कुबेर भंडारी’साठी भाविक मोठ्या संख्येने जाऊ लागले.
आपल्या लहानपणी संतोषीमातेचे दिवस होते. शुक्रवार म्हणजे मोठा दिवस असायचा. शाळेत अंताक्षरी खेळताना ‘म’ आलाच, की मैं तो आरती उतारू रे सहज तोंडातून बाहेर पडायचे. गुलशन कुमार निर्मित शिर्डी के साईबाबा चित्रपटानंतर काही वर्षांतच शिर्डीचे साईबाबा घराघरात पोहोचले.
त्यासोबतच शिंगणापूरचे शनिमहाराजांची महती अनेकांपर्यंत पोहोचली होती. या चित्रपट निर्मितीनंतर हाय-वेच्या रस्त्यावर, दुकानांवर, वाहनांवर, गळ्यात पट्ट्या बांधलेले असंख्य साईभक्त दिसू लागले. जणू साईभक्त असणं हीच ओळख बनली होती. अर्थात, ज्यांनी साईबाबांच्या चमत्कारांचा अनुभव घेतला, त्यांनाच त्यांच्या महतीची खरी जाणीव आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, अक्कलकोट, शेगाव, पंढरपूर अशा यात्रांची लाट आली. कधी एखाद्या महाराजांचा महिमा वाढतो, तर कधी एखाद्या मंदिराची चर्चा होते. हजारो लोक गाड्या भरून दर्शनासाठी जाऊ लागतात.
काही काळ निर्मलादेवी यांचा सहजयोग चर्चेत होता. पुढे भय्यूजी महाराज, डॉ. अनिरुद्ध बापू, प.पू. गगनगिरी महाराज, नरेंद्र महाराज, तसेच आठवलेशास्त्रींच्या स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून पांडुरंगशास्त्रींचा विचार ग्रामीण भागात पोहोचला. आजच्या काळात शिवमहापुराण कथाकथन करणारे पंडित शर्मा, भागवत कथाकथन करणारे विविध व्यासपीठांवरील कथाकार, वारकरी परंपरेमधले कीर्तनकार यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर संपन्न होत आहेत ही मोठी भाग्याची गोष्ट मानावी लागेल. उत्तराखंडमधील कैची धाम येथील नीम करोली बाबांच्या दर्शनालाही अनेक भाविक आदराने जातात.
मधल्या काळात मेडिकल टुरिझमप्रमाणेच ‘आध्यात्मिक टुरिझम’ची संकल्पना रूढ झाली. दारू सोडण्यासाठी अमुक ठिकाणी, कर्जमुक्तीसाठी तमुक ठिकाणी, आजार बरा होण्यासाठी वेगळ्या ठिकाणी, अशा प्रकारे श्रद्धेचे वेगवेगळे नकाशे तयार झाले.
यामागे एक महत्त्वाचे मानसशास्त्र आहे. माणसाला चमत्कार आवडतात.
कुणी सांगितले, मी तिकडे गेलो आणि माझा आजार बरा झाला, किंवा माझं अडकलेलं काम झालं, की मन लगेच म्हणतं, माझ्याबाबतीतही असंच व्हायला हवं. याच भावनेतून श्रद्धा पसरते आणि हळूहळू ती ट्रेंड बनते. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आजूबाजूचे लोक ज्या दिशेने जातात, त्याच दिशेने आपणही नकळत वळतो.
शेजारी पारायण करत असतील, घरात साईचरित्र, भागवत किंवा नवनाथ वाचन होत असेल, मित्र एखाद्या महाराजांचे भक्त असतील, सोशल मीडियावर संतांचे व्हिडीओ सतत दिसत असतील, तर त्या प्रवाहात सामील होणे सहज घडते. काही वेळा हा संस्कारांचा भाग असतो, तर काही वेळा श्रद्धेचा.
मात्र, आज श्रद्धाही डिजिटल झाली आहे. रील्स, स्टेटस, युट्यूब व्हिडीओ, फॉरवर्ड मेसेजेस, हे पाहिलं की चमत्कार होईल, हे शेअर केलं की पुण्य मिळेल अशा ओळींमधून भक्ती अनेकदा अनुभूती न राहता व्हायरल कंटेंट बनते.
यात सर्व काहीच चुकीचे आहे असे नाही. कारण खरी भक्ती माणसाला शांतता देते, आशा देते, नैराश्य कमी करते आणि आत्मविश्वास वाढवते. मात्र, एक फरक लक्षात ठेवणे गरजेचे आहे,
श्रद्धा म्हणजे विश्वास आणि विवेक यांचा संगम.. अंधश्रद्धा म्हणजे विश्वासातून विचार वजा झालेली अवस्था. जेव्हा भक्ती विचारशून्य होते, तेव्हा ती फक्त फॅशन बनते. जेव्हा भक्ती समजून घेतली जाते, तेव्हा ती जीवनदर्शन बनते.
संत, देव, बाबा, माता हे सगळे माध्यम आहेत. खरा केंद्रबिंदू माणूस आहे. जर श्रद्धा माणसाला अधिक प्रामाणिक, अधिक करुणावान आणि अधिक जबाबदार बनवत असेल, तर ती श्रेष्ठ आहे. पण ती फक्त लोक करत आहेत म्हणून, भीतीपोटी किंवा दिखाव्यासाठी असेल, तर ती उथळ ठरते.
आज भक्ती कमी वैयक्तिक आणि अधिक सार्वजनिक झाली आहे. आतून कमी आणि बाहेरून जास्त दिसणारी झाली आहे. डीजेच्या तालावर साजरी होणारी भक्ती, भव्य देखावे, मोठमोठे बॅनर यामध्ये अध्यात्मापेक्षा दिखावा आणि प्रदर्शन अधिक दिसते.
थोडक्यात सांगायचे तर, भक्तीचे ट्रेंड येत-जात राहतात. तुम्ही कोणत्याही दैवताची पूजा करा. मात्र, ती मनापासून आणि श्रद्धेने केली, तर ती नक्कीच त्या देवापर्यंत पोहोचते.
खरी श्रद्धा पोस्टमध्ये नसते,
स्टेटसमध्ये नसते, गर्दीत नसते, ती असते माणसाच्या वागण्यात, त्याच्या प्रामाणिकपणात, त्याच्या करुणेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या कर्तव्यात.
Faith, trend and man
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…
दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…
भारत हा विकसनशील देश आहे. अवघ्या सत्तर एक वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला सुरुवातीलाच पंडित जवाहरलाल…