बारा लाखाचे  बनावट पनीर जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारखान्यांवर धाड

नाशिक : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाने पनीर व इतर पदार्थ बनविणार्‍या दोन कारखान्यांवर कारवाई करुन बारा लाखांचे बनावट पनीर जप्त केले. अंबड येथील मधुर डेअरी आणि डेलीनीडस आणि म्हसरुळ येथील आनंद कारखान्यावर धाड टाकून बनावट पनीर आणि इतर खाद्यपदार्थ जप्त केले.
आगामी सण उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर भेसळयुक्त पदार्थ विकणार्‍यांचे मोठे पेव फुटते. त्यामुळे एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी  पी. एस. पाटील, अ.उ.रासकर, एस. के. पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने मे मधुर डेअरी ऍड डेलीनिडस्, अंबड या आस्थापनेवर धाड टाकण्यात आली. आस्थापनेत अप्पासाहेब हरी घुले हा आढळून आला. त्याच्याकडे आस्थापनेला अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना आढळून आला नाही. आस्थापनेत विनापरवाना बनावट पनीर व तुपाच्या विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्याचे आढळले. पनीर हे रिफाइंड पामोलिन तेलाचा वापर करुन बनावटरित्या तयार करत असतांना आढळले. कारखान्यात तयार झालेले पनीर व तूप हे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मध्ये नमूद तरतुदीनुसार तयार केले जात नसल्याचे आढळून आले. संशयावरुन विक्रेता घुले यांच्याकडील पनीर, ऍसीटीक ऍसीड, रिफाइंड पामोलीन तेल, आणि तूप असा एकूण 2,35,796 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. वैध परवाना धारण केल्याशिवाय अन्नव्यवसाय न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा अधिकारी डी.डी. तांबोळी,अ.र. दाभाडे,  गो. वि. कासार यांच्या पथकाने  आनंद डेअरी फार्म, म्हसरुळ या आस्थापनेवर धाड टाकली. आस्थापनेत आनंद वर्मा यांना विचारपूस  केली असता विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे बनावट  दुध पावडर व खाद्यतेलाचा वापर करून उत्पादित केलेले असल्याचे सांगितल. त्याठिकाणी दुध पावडर, रिफाईंड पाम तेलाचा साठा उपलब्ध असल्याने पनीरचा नमुना तसेच भेसळकारी पदार्थ यांचे नमुने घेऊन त्यांचा एकूण 9,67,315 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही कारखाने सिल करण्यात आलेले आहे. दोन्ही कारखान्यावर  सहायक आयुक्त ( अन्न ) उ.सि. लोहकरे यांच्या  निर्देशानुसार नाशिक विभागाचे सह आयुक्त ग.सु. परळीकर , यांच्या मार्गदर्शनानुसार पथकाने कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *