कर्ज आणि नापिकीमुळे टोकाचे पाऊल
चांदवड : वार्ताहर
चांदवड तालुक्यातील शिंगवे गावातील शेतकरी बजरंग नरहरी मढे (वय 48) यांनी बुधवारी (दि. 12) दुपारी घराशेजारील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतीत झालेल्या नुकसानीमुळे वाढलेले कर्ज आणि सततच्या नापिकीला कंटाळून त्यांनी हे गंभीर पाऊल उचलले.
बजरंग मढे यांना गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत होता. कधी पावसाअभावी, तर कधी अतिवृष्टीमुळे पिके नष्ट होत असल्याने शेतीमधील खर्चही वसूल होत नव्हता. यामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण वाढत गेला. वडिलांच्या नावावरील सोसायटीचे कर्ज फेडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. तसेच, त्यांनी आपल्या दोन विवाहित मुलींचे लग्न लावण्यासाठी नातेवाइकांकडून पैसे उधार घेतले होते.
विशेष म्हणजे, शासनाच्या योजनेतून मंजूर झालेल्या बैलगोठ्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यांना कुटुंबाकडून पुन्हा कर्ज घ्यावे लागले होते, मात्र यासाठी मिळणारे अनुदान अद्यापपर्यंत त्यांच्या हाती पडले नव्हते. यंदाच्या वर्षीदेखील ओल्या दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या सर्व समस्यांमुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी बुधवारी दुपारी बैलगोठ्यात गळफास घेतला. त्यांच्या निधनाने दोन विवाहित मुली, दोन लहान मुले आणि वृद्ध आई-वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.