द्राक्ष बागेत ट्रक घुसल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
विंचूर : प्रतिनिधी
येथील भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे यांच्या काढणीला आलेल्या द्राक्ष बागेत सोळा टायर चा ट्रक घुसल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
आज दुपारच्या सुमारास लासलगाव कडून विंचूर कडे येणारा ट्रक क्र. MH 15 JW 6044 हा जनार्दन स्वामी आश्रमच्या समोर असलेल्या द्राक्ष बागेत घुसला. त्यामुळे सुमारे 100 च्या वर द्राक्ष झाडे भुई सपाट झाली. दोन दिवसात काढणीला आलेला बाग व्यापारी घेऊन जाणार होता. मात्र झालेल्या अपघातामुळे द्राक्षांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. सदरचा ट्रक लासलगाव येथील रघुवीर भेळ भत्ता सेंटर चे संचालक शरद संतोष निकम यांचा असून ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.सदर घटनेत वित्तहानी झाली आहे.मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. विंचूर लासलगाव रस्ता हा मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे. या रस्त्यावरील वाढती रहदारी लक्षात घेता लवकरात लवकर येथे चौपदरीकरणाचे काम सुरू करावे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.