रिंगरोडला विंचूर गवळीच्या शेतकर्‍यांचा विरोध

शिलापूर : प्रतिनिधी
नाशिक रिंगरोडच्या नवीन सर्वेक्षणाला विंचूर गवळी येथील शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शवित जुने सर्वेक्षण कायम ठेवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांच्या वतीने सरपंच विजय रिकामे यांनी दिला आहे.

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा ताण कमी करण्यासाठी रिंगरोडची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र, यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहे. शेती हे शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे शेतीवर आधारित असणार्‍या शेतकरी कुटुंबांची पुढची पिढी कशी उभी करायची, असा उद्विग्न प्रश्न विंचूर गवळीतील बाधित शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. जुन्या
सर्वेक्षणानुसार विंचूर गवळीतील केवळ 21 शेतकरी बाधित होणार होते.
तसेच जुन्या सर्वेक्षणानुसार विंचूर गवळीतील शासकीय गटातून सर्वेक्षण झाल्यामुळे कमी शेतकरी बाधित होणार होते. तशी अधिसूचनाही निघाली होती. परंतु रिंगरोडच्या नवीन सर्वेक्षणानुसार 88 शेतकरी बाधित होत आहेत. यामध्ये विंचूर गवळीतील दोन मंदिरे, गावात असलेले एकमेव शालेय विद्यार्थ्यांचे क्रीडांगण यात समाविष्ट होत असल्याने विद्यार्थ्यांनी व पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील अनेक शेतकरी अल्पभूधारक असून, रिंगरोडमुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहे. त्यामुळे शासनाच्या या नवीन सर्वेक्षणाला विरोध दर्शविला असून, नवीन रिंगरोडच्या
सर्वेक्षणानुसार शेतकर्‍यांच्या विहिरी, घरे, जमिनी यात समाविष्ट होत असल्यामुळे शेतकर्‍यांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न सर्वेक्षणाला आलेल्या अधिकारी वर्गाला विचारला असता ते निरुत्तर झाले. नवीन सर्वेक्षण रद्द न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तसेच गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा सरपंच विजय रिकामे, योगेश रिकामे, नामदेव रिकाम, बाबूराव भुसारे, नरहरी नरवडे, तानाजी रिकामे, प्रकाश रिकामे, अरुण रिकामे, विठ्ठल रिकामे आदी शेतकर्‍यांनी दिला आहे.

देवळाली मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे यांनी याबाबत अधिकार्‍यांना जाब विचारला असता, त्यांनी जुन्या
सर्वेक्षणानुसार रिंगरोड करणार असल्याचे मान्य केले. नवीन संरक्षणाचे काम मात्र करण्यात येत आहे. यात धनदांडग्या लोकांना वाचविण्याचा अधिकार्‍यांचा हेतू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे 88 शेतकरी बाधित होत आहेत. नवीन सर्वेक्षण रद्द न झाल्यास वेळप्रसंगी आपण रस्त्यावर उतरू. – विजय रिकामे, सरपंच

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *