7 बस, 3 कार एकमेकांवर धडकल्या
नवी दिल्ली :
दाट धुक्यांमुळे मुथरेत यमुना एक्स्प्रेस-वेवर थरकाप उडवणारी घटना घडली आहे. सात बस आणि तीन कार अशी दहा वाहने एकमेकांना धडकली. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना एक्सप्रेस-वेवर हा अपघात झाला. या अपघातात आगीमुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले, या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले.
मंगळवारी भल्या पहाटे प्रवासी साखरझोपेत असताना ही घटना घडली. ही घटना आग्रा ते नोएडा मार्गावर बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेहरा गावाजवळ घडली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. मदतकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पोहोचवले. मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सात बस आणि तीन लहान कार एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे अनेक प्रवासी वाहनांमध्येच अडकले. काही प्रवाशांनी खाली उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, आत अडकलेल्या प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली. या बसेस आग्राकडून नोएडाच्या दिशेने येत होत्या. पहाटेच्या दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडली. सुरुवातीला एका कारची दुसर्या कारला धडक बसली आणि त्यानंतर ही धडक मालिका सुरू झाली. एकापाठोपाठ एक गाड्या आदळत गेल्या. टक्कर झाल्यानंतर काही क्षणातच या वाहनांनी पेट
घेतला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा जिल्ह्यातील रस्ते अपघाताची दखल घेतली आहे. अधिकार्यांना तातडीनं घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
new delhi
Fatal accident due to dense fog