दिघवद, काजीसांगवी परिसरात शोककळा


प्रज्ञा दौलत हिरेे प्रज्वल दौलत हिरेे
चांदवड/दिघवद : प्रतिनिधी
चांदवड तालुक्यातील दिघवद शिवार आणि काजीसांगवी येथील इनाम वस्तीजवळ काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका 34 वर्षीय पित्याने आपल्या पोटच्या दोन निष्पाप मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारी (दि. 26) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दौलत रामभाऊ हिरे (वय 34), त्यांची मुलगी प्रज्ञा (वय 10) आणि मुलगा प्रज्वल (वय 4) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दौलत हिरेे ग्रामपंचायत कर्मचारी होते. बुधवारी सकाळी त्यांनी आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि रायपूर येथील स्कूबा डायव्हर्सच्या मदतीने तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. विहिरीतूनचिमुकल्या प्रज्ञा आणि प्रज्वल यांचे मृतदेह बाहेर काढताच उपस्थित ग्रामस्थांचा व नातेवाईकांचा आक्रोश अनावर झाला. हसत्या-खेळत्या वयात या मुलांचा असा अंत झाल्याने पाहणार्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. दौलत हिरे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आर्थिक विवंचना किंवा घरगुती तणावातून ही आत्महत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून, चांदवड पोलीस तपास करत आहेत.