बाप असतो उन्हामध्ये सावली देणारं वडाचं झाड…

कवी कमलाकर देसले यांच्या स्मृतींना मायबाप मैफलीतून उजाळा

मालेगाव : प्रतिनिधी
ऊन घेऊन माथ्यावरती,
पाखरांचे तो करतो लाड;
बाप असतो उन्हामध्ये सावली देणारं वडाचं झाड…
प्रत्येकाच्या आयुष्यातील बापाचं अस्तित्व अधोरेखित करणार्‍या या कवितेने मालेगावकर रसिक श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. निमित्त होते, अरुणराज प्रस्तुत मायबाप या काव्यमैफलीचे. तालुक्यातील झोडगे येथील स्व. कवी, गझलकार कमलाकर (आबा) देसले यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रविवारी (दि.1) देसले कुटुंबाने मायबाप ही आई-वडिलांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारी काव्य मैफल आयोजित केली होती.
कवी राजेंद्र उगले, अरुण इंगळे, रवींद्र मालुंजकर यांनी विविध कवींच्या आई-बापविषयक कवितांचे भावस्पर्शी सादरीकरण करीत श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. कवी उगले व इंगळे यांनी मायबापाची विसरू नका कीर्ती, या पहिल्याच कवितेतून रसिकांची दाद मिळवली. राजेंद्र उगले यांच्या बाप सोडून जाताना व अरुण इंगळे यांच्या कधी कधी माझा बापच मला माझी आई वाटतो, या कवितांनी श्रोत्यांचा गहिवर दाटून आला. यांसह कवी काशीनाथ वेलदोडे यांची झाडाच्या पानापानांत माय मुख तुझे दिसे, कवी विजयकुमार मिठे यांची लक्तराची जिंदगी जोडीत गेला बाप माझा, कवी प्रशांत केंदळे यांची बाप मनात जपतो लेक त्याची सोनपरी या आशयघन कवितांनी आई-बापाचा संघर्ष, मुलगा, मुलगी अन् कुटुंबाशी असलेले भावनिक नाते, बदलत्या काळात आई-वडिलांची होणारी उपेक्षा अशा विविध विषयांवर भाष्य करीत श्रोत्यांना अंतर्मुख केले.
तुषार देसले यांनी काव्यमैफलीच्या आयोजनाची भूमिका व आबांच्या आठवणींना उजाळा दिला. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालनात मायबापविषयक काव्यपक्तींची पेरणी करीत मैफलीस वेगळ्या भावनिक उंचीवर नेले. यावेळी साहित्य, कला, शिक्षण, आरोग्य, विधी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी चित्रा देसले, स्वाती देसले, ओम देसले, उन्नती देसले, प्रकाश गांगुर्डे, सुधीर देसले, मानसी देसले, निनाद देसाई आदींनी परिश्रम घेतले.

देसलेंंच्या कवितांनी पाणावले डोळे
मैफलीत कवींनी देसले यांच्या मैत्रीपूर्ण आठवणी जागवत त्यांच्या बाप आणि वड, दिवली गं सई बाई, आई तू शिकायला पाहिजे, आठवते आई, विठाई या कविता सादर केल्या. स्वाती देसले यांनी सोस सोसता सोसता कविता सादर केली. देसले यांच्या कवितांनी श्रोते आई-बापाच्या भावविश्वात रममाण झाले, तर अनेकांचे डोळे पाणावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *